मंत्र्यांना कामच नाही - यशवंत सिन्हा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यलयातूनच सर्व विभागांचे काम सुरू असून, केंद्रीय मंत्र्यांना कामच उरले नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. सिन्हा यांनी सर्व पक्षीय नेत्यांची राष्ट्रमंच ही संघटना उभारली असून, या संघटनेच्या "लोकशाही वाचवा, संविधान वाचवा', या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यलयातूनच सर्व विभागांचे काम सुरू असून, केंद्रीय मंत्र्यांना कामच उरले नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. सिन्हा यांनी सर्व पक्षीय नेत्यांची राष्ट्रमंच ही संघटना उभारली असून, या संघटनेच्या "लोकशाही वाचवा, संविधान वाचवा', या कार्यक्रमात ते बोलत होते.

"गृहमंत्री राजनाथनसिंह यांना काश्‍मीरमधील मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढला हे माहीतच नव्हते. ईशान्य भारतासाठी सुरक्षाविषयक धोरण मोदी यांनी घोषित केले, त्याचीही माहिती त्यांना नव्हती.

नोटाबंदीच्या निर्णयाबाबत अर्थमंत्री अरुण जेटलीही अनभिज्ञ होते,' असा दावा सिन्हा यांनी केला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही काम न उरल्याने त्या ट्विटरवर परराष्ट्र खाते चालवतात, अशी टीकाही त्यांनी केली. देशात सध्या संविधानाची पायमल्ली सुरू आहे. केवळ एकाधिकारशाहीवर कारभार सुरू आहे. हा कारभार असाच सुरू राहिल्यास भारतीय लोकशाही धोक्‍यात आल्याशिवाय राहणार नाही; पण मुंबई ही क्रांतीची नगरी आहे. इथून सुरू झालेली लढाई लोकशाहीचा निःपात करणाऱ्यांच्या विरोधात नक्कीच जिंकू, असा विश्वास सिन्हा यांनी या वेळी व्यक्त केला.

"राष्ट्रमंच'च्या कार्यक्रमात "आप'चे खासदार संजय सिंग, तृणमूल कॉंग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी, "आप'च्या प्रवक्‍त्या प्रीती मेनन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मजीद मेमन, ज्येष्ठ वकील आभा सिंह, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते घनश्‍याम तिवारी, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे उपस्थित होते.

संविधान वाचवायची वेळ आली आहे. देशात आतापर्यंत गोरक्षा आणि धर्माच्या नावावर 72 जणांची हत्या झाली आहे. माध्यमांनी न घाबरता काम केले पाहिजे, त्याशिवाय सत्यस्थिती लोकांपर्यंत पोचणार नाही. आता 2019 ला बदल न घडविल्यास संविधान जाऊन भारतात हुकूमशाही अवतरेल.
- अरुण शौरी, माजी केंद्रीय मंत्री

Web Title: no work for minister yashwant sinha