अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी 19 ऑक्‍टोबरपासून पुन्हा आक्रमक?

तेजस वाघमारे
Thursday, 1 October 2020

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर गुरुवारी  राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन तूर्त स्थगित केले.

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर गुरुवारी (ता.1) राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन तूर्त स्थगित केले. मागण्या मान्य न झाल्यास 19 ऑक्‍टोबरपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने दिला आहे. 

हे वाचा : महामुंबईच्या जैवविविधतेचा नकाशा तयार 

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित संरचना लागू करणे आणि सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजनासंदर्भातील मागणीसाठी संघटना गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ हे लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. 

हे वाचा : किमान आता तरी चाचण्यांचे प्रमाण वाढवा 

कर्मचाऱ्यांच्या दहा प्रमुख मागण्यांपैकी चार मागण्या मान्य झाल्या असून अन्य दोन मागण्यांची पूर्तता त्वरित करण्याचे आश्‍वासन सामंत यांनी संघटनेला दिले आहे. यानंतर संघटनेने राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या तात्पुरत्या स्थगितीची घोषणा संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. 
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, तसेच मंत्रालयातील अनेक, अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी केलेल्या विनंती लक्षात घेत आंदोलन तूर्त मागे घेत आहोत. आम्ही केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 17 ऑक्‍टोबरपर्यंत प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक न झाल्यास 19 ऑक्‍टोबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही या पत्रातून केला आहे. 

...अन्यथा निकालावर पुन्हा परिणाम 
आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील चार ते पाच विद्यापीठांनी आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. आंदोलनाचा थेट परिणाम अंतिम सत्राच्या परीक्षा व निकालावर होणार होता. आता सरकारला या पंधरा दिवसांत अंतिम निर्णय घेऊन मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत, अन्यथा निकालावर पुन्हा याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

(संपादन : नीलेश पाटील)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-agricultural university staff will strike  from October 19