मांसाहारींनाही घर देण्याची हमी न दिल्यास धडा शिकवू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

मनसेचा बांधकाम व्यावसायिकांना इशारा

मनसेचा बांधकाम व्यावसायिकांना इशारा
मुंबई - मांसाहारी व्यक्तींना घर नाकारणार नाही, असे हमीपत्र लिहून द्या; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) "स्टाईल'ने धडा शिकवू, असा इशारा माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिला. त्यानंतर अनेक बांधकाम व्यावसायिकांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना अशी हमीपत्रे लिहून दिली आहेत.

मुंबईत अनेक वसाहतींमध्ये मांसाहारी मराठी व्यक्तींना घरे नाकारण्याचे प्रकार घडतात. महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेने या भाषिक-धार्मिक वादात उडी घेताना अशा प्रकारांना विरोध केला होता; मात्र निवडणुकीनंतर मनसेने पुन्हा याबाबत सक्रिय होऊन ठाम भूमिका घेतल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होत आहे.

देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिकांना असा इशारा दिल्याचे पत्र लिहिले होते. त्यानंतर दोनच दिवसांत काही बांधकाम व्यावसायिकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून, आपण असा भेदभाव करत नाही व यापुढेही करणार नाही, असे पत्र दिले आहे. बांधकाम व्यावसायिकांनी घरे देताना जाती-धर्म किंवा आहाराबाबत भेदभाव करू नये, अशा आशयाचे हमीपत्र बिल्डरांनी आम्हाला द्यावे. ते न दिल्यास आम्ही बिल्डरांना "मनसे स्टाईल'ने धडा शिकवू, असेही पत्रात म्हटले आहे.

Web Title: non vegetarian issue to home