दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार

दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार
दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार

नवी मुंबई : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांच्या निकालाची प्रतीक्षा आज (ता.२४) संपणार आहे. ऐरोलीतील सरस्वती विद्यामंदिर आणि नेरूळच्या आगरी-कोळी भवनात निकाल घोषित करण्यात येईल. दोन्ही मतमोजणी केंद्रांत निकालासाठीची आवश्‍यक ती तयारी पूर्ण झाल्याने दुपारपर्यंत नवी मुंबईचे चित्र स्पष्ट होणार आहे. या दोन्ही मतमोजणी केंद्रांवर शिवसेना-भाजप महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. 

ऐरोली विधानसभा मतदारसंघाकरीता एक लाख ९६ हजार १२८ मतदारांनी हक्क बजावला. ऐरोलीतील ४४० मतदान केंद्रांवरील मतदानाची १४ टेबलांवर ३२ फेऱ्यांमध्ये मोजणी होईल. त्याकरीता ऐरोलीच्या सरस्वती विद्यामंदिर शाळेत निवडणूक आयोगाचे २०० हून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत. सोमवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर या शाळेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन आणून सुरक्षित ठेवण्यात आल्या. ऐरोलीत नाईकांच्या रुपाने भाजपला जिंकण्याची हमी अधिक असल्याने निकालाच्या दिवशी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाऊ शकते. 

बेलापूर मतदारसंघाकरिता एक लाख ७४ हजार २८३ मतदानाची नोंद झाली. नेरूळ येथील आगरी-कोळी भवनात ३८६ मतदान केंद्र, २० टेबलांवर २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असली तरी मंदा म्हात्रे, अशोक गावडे, गजानन काळे यांच्यात तिरंगी लढत झाल्याने बेलापूर मतदारसंघात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक मंदा म्हात्रेंसाठी प्रतिष्ठेची असल्यामुळे भाजपला ही निवडणूक महत्त्वाची आहे. या मतदारसंघात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनासाठी हजर राहणार असल्याने मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. या मतमोजणीदरम्यान शक्तिप्रदर्शन करताना अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी दोन्ही मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात केला आहे. 

ऐरोली व बेलापूर मतदारसंघांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रत्येकी एका सहायक पोलिस आयुक्तांकडे आहे. सुमारे एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित असतील. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, वादविवाद टाळण्यासाठी विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. 
- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ- १.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com