उत्तर- मध्य मुंबईतील हार शिवसेनेला मारक

उत्तर- मध्य मुंबईतील हार शिवसेनेला मारक

मातब्बर नगरसेवक हारले; "मॅजिक फिगर'चे स्वप्न भंगले
मुंबई - अटीतटीच्या झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर- मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा जोमाने फडकला नाही. प्रभाग रचनेतील बदलामुळे शिवसेनेच्या नऊ दिग्गजांना पालिकेचे दरवाजे बंद झाले.

त्याचा फटका थेट शिवसेनेच्या 114 या "मॅजिक फिगर'ला बसला आहे.
उत्तर- मध्य मुंबईत विलेपार्ले, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, पश्‍चिम आणि चांदिवली हे विधानसभा मतदारसंघ येतात. लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हातात असला, तरी विधानसभा पातळीवर तीन जागांवर शिवसेनेची मक्तेदारी आहे. पालिका निवडणुकीत कोणाचीही युती न झाल्याने उमेदवारांची संख्या अधिक होती. मुस्लिमबहुल भागात एमआयएम, कॉंग्रेस, समाजवादी पक्षाचे प्राबल्य असल्याने शिवसेना- भाजपची कसोटी होती. कुर्ला, कलिना व चांदिवली विधानसभा मतदारसंघांतून 21 पैकी 18 जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट शिवसेनेचे आमदार व विभागप्रमुख संजय पोतनीस यांनी डोळ्यासमोर ठेवले. त्यांना सातच नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. प्रभाग रचना बदल्याने जुन्या नगरसेवकांना फटका बसला. डॉ. अनुराधा पेडणेकर, दर्शना शिंदे, एस. अण्णामलाई, मनाली तुळसकर यांच्यासारख्या नऊ नगरसेवकांना हार पत्कारावी लागली. कामाच्या जोरावर हे नगरसेवक निवडून आले असते, तर हा आकडा 16 वर गेला असता. नेमकी हीच संख्या शिवसेनेला बहुमताच्या जवळ नेण्यास कारणीभूत ठरली असती. शिवसेनेची ही स्थिती असताना कुर्ल्यात भाजपला खाते उघडता आले नाही.

विलेपार्ले मतदारसंघ हा भाजपच्या हातात आला. भाजपचे आमदार पराग अळवणी व कॉंग्रेसमधून भाजपमध्ये ऐन निवडणुकीच्या वेळी दाखल झालेले माजी आमदार कृष्णा हेगडे यांची रणनीती पालिका निवडणुकीत यशस्वी ठरली.

एमआयएमचा चकित करणारा विजय
वांद्रे पूर्वेला शिवसेनेला मातोश्री बालेकिल्ला राखण्यात यश आले. विशेष म्हणजे वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, वांद्रे टर्मिनस, गरीबनगर भागात शिवसेनेने मुस्लिम उमेदवार दिल्याने विजय निश्‍चित झाला. प्रभाग क्रमांक 92 मधून (भारतनगर, बीकेसी) एमआयएमचे उमेदवार गुलनाझ कुरेशींचा विजय चकित करणारा आहे. उमेदवार मूळ माहीमचा राहणारा असूनही विजय मिळवला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या वांद्रे पश्‍चिम मतदारसंघात भाजपला तीन जागा मिळाल्या. मागील निवडणुकीत एकच जागा भाजपची होती. शिवसेनेला एक जागा मिळाली. चांदिवलीत शिवसेनेला तीन, भाजपला दोन; तर मनसे, कॉंग्रेस व अपक्ष उमेदवाराला प्रत्येकी एक जागा मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com