उत्तर भारतीयांची मते ठरणार निर्णायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

संख्येमुळे सर्वच पक्षांनी उत्तर भारतीयांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे...

डोंबिवली - ठाणे पालिका निवडणुकीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेल्या दिवा शहरात यंदा मनसे, शिवसेना व भाजप या पक्षांत तिरंगी लढत होणार आहे. नगरसेवकांची संख्या यंदा दोनवरून ११ वर गेल्याने दिव्यातील मतदारांचे एक-एक मत हे महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यातच येथे उत्तर भारतीय मतदारांची संख्याही जास्त असल्यामुळे निवडणुकीत ही मते निर्णायक ठरणार आहेत.

दिव्यात स्थानिक पातळीवर शिवसेनेचा जनसंपर्क दांडगा आहे. मागील निवडणुकीत मतदारांनी मनसेकडे कौल दिला होता; तर भाजपनेही अलीकडे येथे आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दिव्यातील उत्तर भारतीय मतांवर भाजपने पहिल्यापासूनच डोळा ठेवून निवडणुकीत मतांचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचा सपाटा लावला होता. या कार्यक्रमाला ठाण्यातील भाजपची नेतेमंडळीही आवर्जून उपस्थित राहत होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या वेळेत मुंबई व पाटणा शहराची तुलना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाद अंगावर ओढून घेतला. त्यांच्या या विधानामुळे उत्तर भारतीयांतून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचा परिणाम दिव्यातील उत्तर भारतीय मतांवरही होण्याचा संभव आहे. शिवसेना आणि भाजप व मनसेने दिव्यात उत्तर भारतीय मतांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. सुरुवातीला उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्या मनसेनेही यंदा मवाळ भूमिका घेऊन उत्तर भारतीयांना गोंजारण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला कंटाळून मागच्या निवडणुकीत मतदारांनी इंजिनाला पसंती दिली होती. मात्र, यंदा नगरसेवकांच्या वाढलेल्या संख्येमुळे सत्तेची समीकरणे बदलली असून उत्तर भारतीय मतांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे.

आगरी समाजाचे वर्चस्व
दिवा स्थानक परिसर, साबे सद्‌गुरूनगर, बी. आर. नगर, दातिवली, भोलेनाथ नगर, बेडेकर नगर येथे कोकणवासीय मतदारांची संख्या अधिक आहे. देसाई, खिडकाळी, दिवा-शिळ, मुंब्रादेवी कॉलनी, आगासन, साळवी नगर व बेडेकर नगर येथे उत्तर भारतीयांची संख्या अधिक आहे. दिव्यात आर्थिक गणिते पाहता, आगरी समाजाचेच वर्चस्व कायम राहिले आहे. यंदाही बहुतांश उमेदवार आगरी समाजाचे आहेत.

Web Title: north indian voter