मुलांच्या भेटीसाठी पित्यांचा निवडणुकीत 'नोटा' 

नेत्वा धुरी
सोमवार, 18 जून 2018

बाळाच्या आजीही! 
सुनबाईशी वाद होऊन खोट्या तक्रारीतून आपल्या मुलाचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत असल्याचे पाहून काही महिला व्यथित झाल्या आहेत. या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनीही "नोटा'चा पर्याय स्वीकारण्याचे ठरवले आहे. आपल्या मुलाची त्याच्या बाळाशी भेट होऊ दिली जात नसल्याचा निषेध त्या करणार आहेत. 

मुंबई : घरात 20 दिवसांचे तान्हुले... बायकोशी वाद झाला... भांडण विकोपाला गेल्यानंतर बायकोने घर कायमचे सोडले. आपल्या दीड वर्षाच्या मुलाला जन्मानंतर तो पिता केवळ दोनदाच पाहू शकला. मुलाच्या भेटीची आस लागलेल्या अशा तब्बल 30 हजार पित्यांनी यासाठी सरकारकडून कायद्याची मदत न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत "नोटा' वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 

दुसऱ्या घटनेत न्यायालयाने वडिलांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर बायको तेथूनच पळून गेली. नऊ महिन्यांपासून तो पिता आपल्या मुलाला भेटण्यासाठी तडफडत आहे. मुलांपासून दुरावलेल्या अशा अनेक वडिलांना आपल्या मुलाची भेट हवी आहे. ही भेट होण्यासाठी त्यांना सरकारकडून कायदेविषयक मदत पाहिजे आहे. 

रविवारी (ता. 17) जगभरात "फादर्स डे' साजरा केला जात असताना आपल्या मुलांपासून दुरावलेल्या या पित्यांनी निवडणुकीत "नोटा' वापरण्याचा निर्णय पक्का केला. "वास्तव फाऊंडेशन'तर्फे पुरुषांच्या हक्कांबाबत आवाज उठवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. रविवारी फादर्स डेनिमित्ताने असाच कार्यक्रम मुंबईत झाला. 

कोर्टकचेरीत बायकोशी तंटा सुरू असलेल्या, पोलिस तक्रारींनंतर मुलाशी दुरावलेल्या तब्बल 50 पुरुषांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने "फादर्स डे'चे सेलिब्रेशन केले. थॅलेसेमियाग्रस्त मुलांची रक्‍ताची गरज पूर्ण करण्यासाठी या पित्यांनी रक्तदान केले. आपल्या मुलाला भेटू शकत नसलो, तरीही रक्तदानातून त्यांनी बापाचे प्रेम व्यक्त केले. कोणी मुलाला दोन वर्षांपासून पाहिलेले नाही, तर "फादर्स डे' असतानाही काहींना मुलाची भेट नाकारली गेली. या दुःखाने व्यथित झालेल्या सर्वच वडिलांनी आता सरकारनेच कायदेशीर पद्धतीने आपली मुलाशी भेट घडवावी, अशी मागणी केली आहे. असे झाले नाही तर, निवडणुकीत नोटा वापरून निषेध व्यक्त केला जाईल, अशी माहिती "वास्तव फाऊंडेशन'चे प्रमुख अमित देशपांडे यांनी दिली. 

बाळाच्या आजीही! 
सुनबाईशी वाद होऊन खोट्या तक्रारीतून आपल्या मुलाचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत असल्याचे पाहून काही महिला व्यथित झाल्या आहेत. या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनीही "नोटा'चा पर्याय स्वीकारण्याचे ठरवले आहे. आपल्या मुलाची त्याच्या बाळाशी भेट होऊ दिली जात नसल्याचा निषेध त्या करणार आहेत. 

Web Title: Nota option use in election