अग्निशमन विभागातर्फे 579 इमारतींना नोटीस 

Fireman
Fireman

नवी मुंबई : आगीच्या घटनांमध्ये होरपळून अनेकांचा जीव धोक्‍यात आल्यानंतरही इमारतींमधील आग प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या तब्बल 579 इमारतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दणका दिला आहे. रहिवासी, वाणिज्यिक, शाळा, रुग्णालये, मॉल, हॉटेल व लॉन्ड्री आदी इमारतींचा यात समावेश आहे. येत्या महिनाभरात संबंधितांनी यंत्रणा कार्यान्वित न केल्यास इमारतींची वीज व नळजोडण्या बंद करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. महापालिकेच्या या नोटिशीनंतर सर्वांचे धाबे दणाणले आहेत. 

डिसेंबर 2017 मध्ये मुंबईत इमारतीच्या छतावर सुरू असलेल्या हॉटेलला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाला; तर काही जण गंभीररीत्या जखमी झाले. हे प्रकरण ताजे असतानाच मे 2019 मध्ये गुजरातमध्येही एका खासगी कोचिंग क्‍लासेसला लागलेल्या आगीत अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचा होरपळून जीव गेला. आग लागून घडलेल्या दुर्दैवी घटनेत शेकडो लोकांचे जीव धोक्‍यात आले आहेत. आगीचा प्रसंग उद्भवल्यास इमारतीमध्येच आग विझवण्याची तात्पुरती यंत्रणा कार्यान्वित असावी, असा महापालिकेने नियम केला आहे. इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र घेताना अनेक जण ही यंत्रणा सुरू ठेवतात; मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महापालिकेने दर वर्षी या इमारतींना आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असल्याचा परीक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश रहिवासी, वाणिज्यिक, रुग्णालये, शाळा आदी इमारतींना दिल्या आहेत. 

अग्निशमन विभागातर्फे या सर्व इमारतींची आग प्रतिबंधक यंत्रणा परीक्षणाचा अहवाल तपासला जातो. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील आठ नोडनिहाय इमारतींची तपासणी केली असता तब्बल 579 इमारतींचे आगप्रतिबंधक यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. या इमारतींच्या पदाधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाकडे आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. यात रहिवासी व वाणिज्यिक वापराच्या सुमारे 500 इमारतींचा समावेश आहे. यात एकट्या कोपरखैरणे विभागात सर्वाधिक 208 इमारतींची नावे नोंदवली आहेत. 17 शाळा-महाविद्यालये आणि 18 रुग्णालयांमध्येही आग विझवण्याची यंत्रणा सुरू नसल्याचे धक्कादायक माहिती अग्निशमन विभागाच्या कार्यवाहीत समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com