नवी मुंबईतील बेकायदा ‘वेदरशेड’ना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील हॉटेल चालकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनांना नोटिसा बजावल्यानंतर आता बेकायदा वेदरशेड (पावसापासून बचाव करण्यासाठी उभारेले छत) उभारणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्याच्या सूचना मिसाळ यांनी विभाग कार्यालयांना दिल्या आहेत.

मुंबई ः महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील हॉटेल चालकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनांना नोटिसा बजावल्यानंतर आता बेकायदा वेदरशेड (पावसापासून बचाव करण्यासाठी उभारेले छत) उभारणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्याच्या सूचना मिसाळ यांनी विभाग कार्यालयांना दिल्या आहेत. बेलापूर आणि वाशी विभाग कार्यालयांमार्फत ३० पेक्षा जास्त हॉटेलांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर तुर्भे विभागात २० पेक्षा जास्त हॉटेलांना लवकरच नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

महापालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवून बेकायदा पद्धतीने शहरात व्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यास मिसाळ यांनी सुरुवात केली आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील हॉटेलांवर उभारलेल्या वेदरशेडवर कारवाई केली होती. त्यानंतर महापालिकेने शहरात अद्याप कोणालाही वेदरशेड उभारण्याची परवानगी दिलेली नाही; मात्र बेलापूर, वाशी, नेरूळ, सीवूडस्‌, तुर्भे आणि ऐरोली येथील काही हॉटेल चालकांनी बिनधास्तपणे वेदरशेड उभारल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. या वेदरशेडखाली हॉटेलात येणाऱ्या अतिरिक्त ग्राहकांना सेवा दिली जाते. 

बेलापूरमध्ये तर काही हॉटेलचालकांनी सौरऊर्जेवर चालणारी यंत्रणाही बसवली आहे. हे पॅनेल पत्र्यावर बसवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत विभाग कार्यालयाला दिसले नव्हते; मात्र आता मिसाळ यांच्या आदेशानंतर संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. तुर्भे परिसरात वेदरशेड बसवलेल्या हॉटेलांच्या सर्वेक्षणाचे काम विभाग कार्यालयाने पूर्ण केले आहे. या परिसरातील तब्बल २० पेक्षा जास्त हॉटेलांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

पळवाट बंद
महापालिकेने हॉटेलांवर थाटलेल्या बेकायदा वेदरशेडना नोटीस बजावल्यानंतर १५ दिवसांत शेड काढून घेण्याची मुदत दिली जाते. या मुदतीत शेड काढून न घेणाऱ्यांवर महापालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येते. परंतु काही हॉटेल चालक न्यायालयात धाव घेत तात्पुरती पळवाट काढत आहेत. हॉटेलांना पळवाटा मिळू नयेत याकरिता न्यायालयात पालिकेतर्फे कॅव्हेट दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

पालिकेच्या नियमांविरोधात व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पालिकेने कोणालाही हॉटेलवर वेदरशेड उभारण्याची परवानगी दिलेली नाही. तरीसुद्धा काही हॉटेलचालक शेड उभारत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to Illegal 'WeatherShed' in Navi Mumbai