रहस्यकथांचा सम्राट तळमळतोय उपेक्षेच्या उन्हात!

वसई - कादंबरीकार गुरुनाथ नाईक आणि त्यांच्या पत्नी गीता नाईक... वसईतील एका रस्त्याकाठी.
वसई - कादंबरीकार गुरुनाथ नाईक आणि त्यांच्या पत्नी गीता नाईक... वसईतील एका रस्त्याकाठी.

नालासोपारा - त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी अवघ्या महाराष्ट्राला झपाटून टाकले होते. त्यांच्या थरारकथांनी एकेकाळी अवघ्या महाविद्यालयीन तरुणाईला थरारून टाकले होते. आजही राज्यातील गावागावांतील ग्रंथालयांची कपाटे त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यांनी सजली आहेत. ते रहस्यकथांचे सम्राट, ‘गोलंदाज’, ‘शिलेदार’, ‘मेजर भोसले’ यांसारख्या अफलातून नायकांचे जनक गुरुनाथ नाईक... आज आयुष्याच्या संधिकाली, आजाराने जर्जर झालेला देह घेऊन वणवण फिरत आहेत. लक्षावधी मराठी जनांना अमूल्य वाचनानंद देणारा हा लेखणीचा बादशहा आज दारिद्य्राच्या वेदना आणि उपेक्षेचे सल सोसत कसाबसा दिवस कंठत आहे. त्यांना अपेक्षा आहे वाचकांच्या स्नेहाची, जमल्यास मदतीच्या हाताची...

चाळीस वर्षे अखंड लिहिता हात होता त्यांचा. १९५७ ते १९६३ या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर या नावानेही लिखाण केले. पुढे १९७० ते १९८२ या काळात तब्बल ७२४ कथा-कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी. २५० शिलेदार कादंबऱ्या, १५० गोलंदाज कथा असा ऐवज दिला त्यांनी. मराठी समीक्षकांनी त्या काळीही त्यांना उपेक्षेने दुर्लक्षित केले; पण आज चाळिशी-पन्नाशीत असलेल्या वाचकांनी त्यांच्या माथ्यावर लोकप्रियतेचा ताज ठेवला होता. तीच त्यांची कमाई होती. या लेखनकामाठीतून पैसेही मिळत त्यांना; पण काहींनी त्यावरही ‘हात मारला.’ नंतर तर शरीरानेच घात केला. पक्षाघाताने त्यांचे लिखाण थांबले. साठवलेली पुंजी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या आजारपणात खर्च झाली. एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे त्यांना; पण मुलाची नोकरी तुटपुंज्या पगाराची. मुलीचे सासरही काही श्रीमंत नाही. तिच्यावरही सासू-सासऱ्यांची, मुलांची जबाबदारी. घर चालवायचे कसे, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. आजारपणाचा खर्च वाढताच होता.

अशात काही वर्षांपूर्वी ते गोव्यात जाऊन स्थिरावले. गोवा सरकारने त्यांना मदत केली. दोन वर्षांसाठी राहायला घर दिले. त्यालाही आता पाच वर्षे झाली. ते घर सोडायची वेळ आता आली आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी राहायला घर नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही अशा अवस्थेत हा साहित्यिक अखेर वसईतील त्यांचे जुने स्नेही विनायक निकम यांच्याकडे गेल्या गुरुवारी- महाराष्ट्रात साहित्याच्या महोत्सवाचे ढोल-ताशे वाजत असल्याच्या काळात- आले... निदान चार घासांची, डोक्‍यावरील छपराची सोय तरी होईल या अपेक्षेने.

शनिवारी साहित्यप्रेमींच्या वसई नगरीतील एका रस्त्यावर ते असेच वणवण फिरताना आढळले. सोबत त्यांच्या पत्नी होत्या. त्यांची विचारपूस केल्यावर ते म्हणाले, ‘या वयात माझे हाल मलाच पाहावत नाहीत. मी ७९ वर्षांचा. बायको पासष्टीची. घर नाही, की खायला अन्न नाही. कोणी मदत करते का हे पाहत फिरतो जुन्या मित्रांकडे. कोणी पैसे देते, कोणी देत नाही. दुर्दैवच आमचे. सरकार आमची दखल घेईल, अशी अपेक्षा होती; पण...’ हे बोलताना एकेकाळच्या त्या रहस्यकथेच्या सम्राटाच्या अवमानित डोळ्यांत वेदनेचे ढग दाटून आल्याचे स्पष्ट दिसत होते...

साहित्य संमेलनावर कोट्यवधींचा खर्च होत आहे. संमेलनातले साहित्यिक आपल्या साहित्यातून समाजाच्या व्यथा-वेदना मांडत आहेत आणि दुसरीकडे हा एक साहित्यिक उतारवयात उपेक्षिताचे जीवन जगत आहे. त्याच्याकडे पाहायला कुणालाच वेळ नाही. मोठी शोकांतिका आहे ही लेखकाची.
- विनायक निकम, नाईक यांचे स्नेही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com