पर्यावरण ऱ्हासामुळे बेडूकदादा थकले

अजित शेडगे : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते.

माणगाव : पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते. २५- ३० वर्षांत या परिस्थितीत बदल झाला असून आता त्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. वातावरणातील बदल, जलप्रदूषण आदी कारणांमुळे निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा जीव नामशेष होण्याची भीती वन्यजीव अभ्यासक आणि ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.

पूर्वी शेतात भरपूर बेडूक दिसत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची संख्या कमालीची घटली आहे. असे का घडले हे समजण्याच्या पलीकडचे आहे, असे पेणगाव (ता. माणगाव) येथील ७० वर्षीय शेतकरी गणपत कालप यांनी सांगितले. शिवारातून हमखास येणारा डराव डराव आवाज कमी येत असल्याने चिंता वाटते, असेही त्यांनी सांगितले.
गाय, बैल, साप, फुलपाखरे, बेडूक हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. काळ बदलला तसे शेतीचे स्वरूपही बदलले. शेतीतील मंत्र आणि तंत्र बदलले आहे. याचा परिणाम विविध प्रजातींवर झाला आहे. त्यामध्ये बेडकाचा प्रमुख समावेश होतो.  पावसाळ्यात शेत, नदी, ओहोळ, माळरानावरून डराव डराव असा आवाज येत होता. तो काही वर्षांत क्षीण झाला आहे. पर्यावरण ऱ्हासामुळे यंदा तर असा अवाज क्वचितच ऐकायला मिळाला, असे उरण तालुक्‍यातील पर्यावरणप्रेमी मनोज पाटील यांनी सांगितले. 

शेतकऱ्याचा मित्र 
बेडूक शेतातील किडे, मुंगे खाऊन पोट भरतो. एक बेडूक दिवसाला एक हजार विविध कृमी कीटक खातो. त्यामुळे शेताचे विविध किडींपासून संरक्षण होते.

कीटकनाशके मुळावर 
आधुनिक पद्धतीत शेतीमध्ये झालेले बदल, विविध खते, औषधे, कीटकनाशके यामुळे बेडकांच्या अस्तित्वाला धोका पोहोचत आहे. परिणामी शेतातील उपद्रवी किटकांची संख्या वाढून शेतीचे नुकसान होत आहे. 
 

तीन वर्षे शिक्षेची तरतूद 
बेडकांना संरक्षण मिळावे म्हणून बेडूक हा वन्यप्राणी घोषित आहे.१९८५ मध्ये वन्यजीव कायद्यानुसार त्यांना पकडणे, मारणे दंडनीय अपराध आहे. २५ हजार दंड आणि तीन वर्षे कैद दोषींना होऊ शकते .

शेताच्या बांधावर पूर्वीप्रमाणे बेडूक दिसत नाहीत. हा चिंतेचा विषय आहे. या उभयचरांचे अस्तित्वच धोक्‍यात आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर विचार करणे आवश्‍यक आहे. जनजागृतीची आवश्‍यकता आहे.
- प्रदीप लांगी, शेतकरी, पाली

काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातून बेडकांची मोठ्या प्रमाणात तस्करी झाली. तेव्हापासून त्यांची संख्या कमी होत गेली आहे. विविध खते, तणनाशके आणि कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे बेडकांची संख्या घटली आहे. 
- प्रवीण कवळे, पर्यावरण वन्यजीव अभ्यासक, अलिबाग

या वर्षी बेडकांचा आवाज कमी आहे. शेतातही ते फारसे दिसत नाहीत. पाऊस जास्त असला तरी बेडकांची संख्या कमी झाली आहे.
- सीताराम पोटले, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now Frog also tired