नवी मुंबईत आता पार्किंग स्वस्त!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत पार्किंगचे दर कमी करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली असून, पालिकेच्या मालमत्ता विभागाने कंत्राटदारांची नेमणूक करण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे.

मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने पार्किगचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून, पालिकेकडून कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाहनचालकांना दिलासा मिळाला असून, वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई महापालिकेच्या पार्किंग स्थळापासून एक किमीच्या अंतरातील ‘नो पार्किंग झोन’मध्ये गाड्यांचे अवैध पार्किंग केल्याचे आढळल्यास १० हजार रुपये दंड आकरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडाची आकारणी करण्यात येत असल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मात्र, याउलट नवी मुंबई महापालिकेने वाहनचालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत येणाऱ्या विधानसभा व महापालिका निवडणुका लक्षात घेता पार्किंगचे दर हे कमी करत नाममात्र शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.  

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राहत असणाऱ्या रहिवाशांच्या उत्पन्नानुसार प्रत्येक घरामध्ये दुचाकी व चारचाकी आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाहन पार्किंगसाठी लावले असता पार्किंगच्या दरावरून ठेकेदरांच्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर वाहनचालकांचे वाद होण्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता नवी मुंबई महापालिकने पार्किंगचे दर नाममात्र केल्यामुळे पार्किंगवरून होणारे वाद मिटणार आहेत. 

नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत पार्किंगचे दर कमी करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली असून, पालिकेच्या मालमत्ता विभागाने कंत्राटदारांची नेमणूक करण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रामधील पार्किंगचे शुल्क जरी कमी करण्यात आले असले तरी शिस्त बिघडवू नये, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे; तर नागरिकांना पार्किंगची सुविधा मिळावी, यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहे. सम, विषम पार्किंग, ओपन स्पेसच्या जागेवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनानेदेखील जास्तीत जास्त पार्किंगच्या जागा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.
- संदीप नाईक, आमदार, ऐरोली.

पार्किंगचे शुल्क कमी करण्यात आल्यामुळे पार्किंगवरून होणारे तंटे मिटणार आहेत; तर नाममात्र शुल्क असल्यामुळे ते भरणेदेखील जड वाटणार नाही. त्यामुळे नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावण्याचे प्रमाण कमी होईल.
- राजा धनावडे, वाहनचालक.

नियमित पार्किंग दर (रुपयात)   
मूळ दर         सुधारित दर
तीन चाकी    ५          ३
चार चाकी    १०         ५

अल्पकालीन पार्किंग
मूळ दर         सुधारित दर
दुचाकी    २          १
तीन चाकी    ५          २
चारचाकी    १०         ५
हलकी 
वाहने वाणिज्य    २०         ५०

नो पार्किंग
मूळ दर         सुधारित दर
दुचाकी    २०         १०
तीनचाकी    ५०         २०
चारचाकी    १००        ५०
हलकी 
वाहने वाणिज्यिक   २००    १००
जड 
वाहने वाणिज्यिक   ५००    २००


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now parking is cheaper in Navi Mumbai!