आता मोकाट गुरांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

महापालिकेने वाहनतळांच्या परिसरातील बेकायदा पार्किंगबद्दल १० ते १५ हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात केल्यानंतर आता रस्त्यांवरील भटक्‍या गुरांकडे मोर्चा वळवला आहे.

मुंबई ः महापालिकेने वाहनतळांच्या परिसरातील बेकायदा पार्किंगबद्दल १० ते १५ हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात केल्यानंतर आता रस्त्यांवरील भटक्‍या गुरांकडे मोर्चा वळवला आहे. रस्ते, पदपथ आणि चौकांत गाई-गुरे बांधून, भाविकांना चारा विक्री करून अनेक जण उदरनिर्वाह चालवतात. या व्यावसायिकांकडून महापालिका आता अडीच हजारांऐवजी १० हजार रुपये वसूल करणार आहे.

वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा होत असल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील मंदिरे, रस्ते, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी गाई-गुरे बांधली जात असल्यामुळे वाहने आणि पादचाऱ्यांची अडचण होते. गाईंना चारा देण्याच्या मोबदल्यात पैसे घेऊन ही मंडळी उदरनिर्वाह चालवतात.

गाई बांधलेल्या ठिकाणी शेण, मूत्र, चारा पडून अस्वच्छता होते आणि परिसरात दुर्गंधी पसरते. अशी गाई-गुरे महापालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत जप्त करण्यात येतात. अशी गुरे सोडण्यासाठी महापालिका पूर्वी अडीच हजार रुपये दंड घेत होती. आता गाई-गुरांच्या मालकाला पाच ते १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

महापालिका कर्मचारी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी बांधलेली गाई-गुरे ताब्यात घेऊन मालाडला नेतात. त्यासाठी वाहन, इंधन, कर्मचारी आदींवर मोठा खर्च येतो. हा खर्च दंडाच्या स्वरूपात वसूल केला जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. पकडण्यात येणाऱ्या मोठ्या जनावरासाठी २५०० रुपये आणि लहान जनावरासाठी १५०० रुपये दंड आकारला जातो. महापालिकेने ही रक्कम मार्च २००४ मध्ये ठरवली होती. या दंडाच्या रकमेत १५ वर्षांनी वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

स्थायी समितीला प्रस्ताव  
पकडण्यात आलेल्या मोठ्या जनावरासाठी १० हजार रुपये आणि लहान जनावरासाठी पाच हजार रुपये दंड आकारला जाईल, असे देवनार पशुवधगृहाच्या महाव्यवस्थापकांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर होण्याची दाट शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now take action on the cattle