'एनआरआय' कोट्यातील वैद्यकीय शुल्क कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

दोन वैद्यकीय महाविद्यालयांचा निर्णय
मुंबई - खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील अवाजवी शुल्कवाढीसंदर्भात तब्बल नऊ महाविद्यालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) डोस दिल्यानंतर यापैकी दोन महाविद्यालयांनी "एनआरआय' कोट्यातील अवाजवी शुल्क कमी केले आहे.

दोन वैद्यकीय महाविद्यालयांचा निर्णय
मुंबई - खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील अवाजवी शुल्कवाढीसंदर्भात तब्बल नऊ महाविद्यालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) डोस दिल्यानंतर यापैकी दोन महाविद्यालयांनी "एनआरआय' कोट्यातील अवाजवी शुल्क कमी केले आहे.

तळेगाव येथील दाभाडे वैद्यकीय महाविद्यालय आणि लातूरमधील वैद्यकीय महाविद्यालयाने शुल्कवाढ कमी केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी संचालनालयाने अवाजवी शुल्क घेणाऱ्या राज्यातील तब्बल नऊ महाविद्यालयांची यादी तयार केली होती. त्यात नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथील पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, धुळ्यातील अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकमधील नाशिक विद्या प्रसारक मंडळाचे यशवंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, नाशिकमधील सिन्नरजवळील तसेच नगर येथील विखे-पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व मुंबईतील प्रेरणा वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश होता. या महाविद्यालयांसह तळेगाव येथील दाभाडे वैद्यकीय महाविद्यालय व लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयानेही आपापल्या महाविद्यालयांतील शुल्काबाबत माहिती दिली होती. दोन्ही महाविद्यालयांनी "एनआरआय' कोट्यातील शुल्क कमी केल्याची नोंद संचालनालयाने घेतली आहे.

नियमानुसार एनआरआय कोट्यातील विद्यार्थ्यांकडून स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा पाच पट जास्त शुल्क घेता येते. या महाविद्यालयांनी त्यापेक्षाही जास्त शुल्क घेतले होते. संचालनालयाच्या हस्तक्षेपानंतर या दोन्ही महाविद्यालयांनी अवाजवी शुल्क कमी केले, अशी माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.

Web Title: nri quota medical fee decrease