अंक ज्योतिष प्रसिद्धीला सहा वर्तमानपत्रांना मनाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - सोलापूरमधील सहा वर्तमानपत्रांमध्ये अंकज्योतिषाच्या नावाने होणाऱ्या आकड्यांच्या प्रसिद्धीला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 3) अंतरिम मनाई केली. तसेच या प्रकाराकडे काणाडोळा करणाऱ्या स्थानिक पोलिसांच्या चौकशीचे आदेशही सोलापूर पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

मुंबई - सोलापूरमधील सहा वर्तमानपत्रांमध्ये अंकज्योतिषाच्या नावाने होणाऱ्या आकड्यांच्या प्रसिद्धीला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 3) अंतरिम मनाई केली. तसेच या प्रकाराकडे काणाडोळा करणाऱ्या स्थानिक पोलिसांच्या चौकशीचे आदेशही सोलापूर पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

सोलापूरमधील काही वर्तमानपत्रांमध्ये ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या नावाखाली नियमितपणे आकडे प्रसिद्ध केले जातात. हा छुप्या पद्धतीचा मटका असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्रीगुरुराज पोरे यांनी ऍड. उमेश माणकपुरे आणि ऍड. अक्षय शिंदे यांच्यामार्फत केली आहे. दैनिक सुराज्य, तरुण भारत, पुण्यनगरी, जागृत जनप्रवास, संचार आणि केसरी यांच्यावर याचिकेत आरोप करण्यात आले आहेत.

मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे आज याचिकेवर सुनावणी झाली. "मुंबई' आणि "कल्याण बाजार'च्या नावाने अशा प्रकारचे आकडे वर्तमानपत्रे कशासाठी प्रसिद्ध करतात? त्यामागे कोण आहेत? या आकड्यांचा वाचकांना कसा काय फायदा होतो, असे प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केले. अंक आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली वर्तमानपत्रे असे प्रकार का करतात? त्यातून कोणते सामाजिक भान जपले जाते? असे प्रश्‍नही खंडपीठाने केले. अशा आकड्यांद्वारे छुपा मटका चालवला जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

याबाबत याचिकादाराने पाच वर्षांपूर्वी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस ठाण्यात फिर्याद केली होती. मात्र संबंधित आकडे हे अंक आणि ज्योतिषशास्त्रासाठी आहेत, हे प्रतिवादींनी दिलेले स्पष्टीकरण मान्य करून पोलिसांनी तपास बंद केल्याचेही याचिकादाराने निदर्शनास आणले. खंडपीठाने या प्रकाराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. पोलिसांना या आकड्यांचा स्रोत तपासावा, असे वाटले नाही का? असे कोण ज्योतिषी आहेत? त्यांची चौकशी का केली नाही, अशा शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. संबंधित पोलिसांची चौकशी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी मंजूर केली आहे.

Web Title: Numerology released six forbidden newspapers