लठ्ठपणा म्हणजे 13 प्रकारच्या कर्करोगांना आमंत्रण... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांची माहिती

मुंबई - लठ्ठपणा अनेक आजारांस कारणीभूत असतो, हे सर्वच जाणतात. पण हाच लठ्ठपणाचा विकार म्हणजे कर्करोगालाही आमंत्रणच असून, त्यामुळे एक-दोन नव्हे, तर तेरा प्रकारचे कर्करोग होऊ शकतात, अशी धक्कादायक माहिती टाटा स्मृती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.

"सकाळ' (मुंबई) च्या 49 व्या वर्धापनदिनानिमित्ताने सुरू करण्यात आलेल्या "होप ऑफ लाईफ' या कर्करोगविषयक जाणीवजागृती मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या "कॉफी विथ सकाळ' या संवाद उपक्रमात डॉ. बडवे बोलत होते. यावेळी त्यांनी कर्करोग, त्याबाबतचे समज-गैरसमज, त्यावरील उपचार आणि त्याबाबतचा सामाजिक-राजकीय दृष्टीकोन याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. 

मोठी बातमी - मोदीजी, मी चालू तरी शकतो का? का त्यावरही बंदी घातली? - कुणाल कामरा

 

Image may contain: 1 person

लठ्ठपणा कमी करण्यासोबतच निरोगी आरोग्यासाठी आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे गरजेचे आहे. चाळिशीनंतर तर आहाराबाबत सजग राहणे अधिक महत्त्वाचे आहे. 

- डॉ. राजेंद्र बडवे, संचालक, टाटा स्मृती रुग्णालय

कर्करोगाबाबत जनजागृती वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. योग्य उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात निदान झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी सरासरी 70 टक्के रुग्ण बरे होत आहेत, अशी दिलासादायक माहिती देतानाच, देशात तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण इतर कर्करोगाच्या तुलनेत जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोठी बातमी - गुजरातमधून येणारा 'हा' पदार्थ तुम्हाला आजारी पाडू शकतो...

तंबाखूमुळे तोंडाचा, जीभेचा, घशाचा, अन्ननलिकेचा, पोटाचा आदी कर्करोग होतात. त्याशिवाय विविध प्रकारच्या प्रादुर्भावामुळे कर्करोग होतो. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे, गर्भाशय मुखाचा कर्करोग. या आजाराचे कारण म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. वैयक्तिक अस्वच्छतेमुळे लैंगिक संबंधावेळी या विषाणूची महिलांना लागण होते; त्यासाठी पुरुषांनी वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मोठी बातमी - आता शिवभोजन थाळी येणार थेट तुमच्या दारी..

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लठ्ठपणा. बदलती जीवनशैली, फास्टफूड, व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाबासह 13 प्रकारचे वेगवेगळे कर्करोग होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे वजन नियंत्रित राखण्यासोबतच नियमित व्यायाम करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉ. बडवे यांनी यावेळी दिला. 

obesity is invitation for 13 different types of cancer says MD of tata memorial hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obesity is invitation for 13 different types of cancer says MD of tata memorial hospital