महाडमधील दुर्गंधी हटणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकण्यात येतो. त्याचा प्रभात कॉलनी आणि स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या परिसरातून जात असताना नागरिकांना व वाहनचालकांना नाक बंद करून जावे लागत होते.

महाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे. 

महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकण्यात येतो. त्याचा प्रभात कॉलनी आणि स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या परिसरातून जात असताना नागरिकांना व वाहनचालकांना नाक बंद करून जावे लागत होते. आता महाड पालिकेने लाडवली या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सुरू केली असल्याने येथे कचरा टाकणे बंद झाले असले, तरीही 15 वर्षांपूर्वीपासूनच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न कायम होता. आता त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो हटवला जाणार आहे. 

बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. हे काम पुणे येथील सुमन रियालिटी अँड इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या संस्थेला देण्यात आले असून यासाठी 17 लाख रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. या संस्थेने महाराष्ट्रातील अनेक कचराभूमीतील कचऱ्यावर प्रक्रिया करून शहरे कचरामुक्त केली आहेत. 

या कामाची सुरुवात नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.6) करण्यात आली. या वेळी उपनगराध्यक्ष वजीर कोंडीवकर, बांधकाम सभापती सुनील कविस्कर, आरोग्य सभापती प्रमोद महाडिक, पाणीपुरवठा सभापती रश्‍मी बाईत, महिला व बालकल्याण सभापती विद्या साळी आणि अन्य नगरसेवक, नगरसेविकांसह मुख्याधिकारी जीवन पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे उपस्थित होते. 

महाड शहरातील नागरिकांना वर्षानुवर्षे कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. तो आता कमी करण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. हे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल. परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 
- स्नेहल जगताप, नगराध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The odor in Mahad will be removed