शेजाऱ्याला धडा शिकवण्यासाठी आक्षेपार्ह पोस्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

ओएलएक्‍सवरही घर विकण्याची खोटी जाहिरात
खापरे याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी २०१४ मध्ये त्यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करून त्यांचे घर विकायचे असल्याची जाहिरात ओएलएक्‍सवर दिली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना दूरध्वनी करून त्रास दिला होता. याप्रकरणी त्या वृद्धाने कांजूरमार्ग व सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. खापरेने या ऑनलाईन गुन्ह्यासाठी जी-मेलचे २१, रेडिफमेलचे २३, झोहोचा एक व आयलुकचे ९३ बनावट आयडी तयार केले होते.

मुंबई - वृद्ध असलेला शेजारी लहानपणापासून ओरडतो म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी १४० बनावट ई-मेल आयडी तयार करून मराठीतील प्रतिथयश वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर सामाजिक तेढ निर्माण होईल, असे संदेश पोस्ट करणाऱ्या नाहूरमधील तरुणाला आझाद मैदान पोलिसांनी सोमवारी अटक केली. सिद्धेश खापरे (३१) असे त्याचे नाव आहे. आयपी ॲड्रेसच्या साह्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

मराठीतील प्रतिथयश वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीचे संपादक या प्रकरणातील तक्रारदार आहेत. वर्षभरापासून एक व्यक्ती या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर वाचकांच्या प्रतिक्रियांमध्ये आक्षेपार्ह लिखाण करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खापरे तक्रारदारांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून तसेच फेसबुकवरील त्यांच्या छायाचित्राचा वापर करून लिखाण करत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी खापरेविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

 खापरेने धार्मिक, जातीय तेढ निर्माण होईल, असे लिखाणही केले होते. एका राजकीय पक्षाच्या विरोधातही या संकेतस्थळावर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे या संकेतस्थळाने खापरेने बनवलेले अनेक ई-मेल आयडी ब्लॉक केले. त्याचा राग धरून आरोपीने तक्रारदारांच्या नावानेही बनावट ई-मेल आयडी तयार करून ते काम करत असलेल्या संकेतस्थळावर धर्माबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या.  

ओएलएक्‍सवरही घर विकण्याची खोटी जाहिरात
खापरे याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी २०१४ मध्ये त्यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करून त्यांचे घर विकायचे असल्याची जाहिरात ओएलएक्‍सवर दिली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना दूरध्वनी करून त्रास दिला होता. याप्रकरणी त्या वृद्धाने कांजूरमार्ग व सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. खापरेने या ऑनलाईन गुन्ह्यासाठी जी-मेलचे २१, रेडिफमेलचे २३, झोहोचा एक व आयलुकचे ९३ बनावट आयडी तयार केले होते.

Web Title: Offensive posts to teach a lesson to a neighbour