आक्षेपार्ह भाषण आचारसंहितेचा भंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

निवडणूक आयोगाची नियमावली जारी

निवडणूक आयोगाची नियमावली जारी
मुंबई - महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवार प्रभागांमध्ये प्रचारासाठी पदयात्रा आणि फेऱ्या काढतात. त्यासाठी जीप, दुचाकी आणि अन्य वाहनांचा ते वापर करतात. काही प्रचारफेऱ्यांमध्ये ध्वनिवर्धकाद्वारे घोषणाबाजी होते. हे करताना सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची उमेदवारांनी दक्षता घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या नियमांचा भंग होणार नाही, ही जबाबदारी संबंधित महापालिकेवर निश्‍चित केली आहे.

आयोगाच्या नियमांचे पालन करून फेरी काढण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागासह अन्य प्रशासकीय यंत्रणांची परवानगी उमेदवाराने घेणे बंधनकारक आहे. या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी संबंधित उमेदवाराला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट नमूद केले आहे.
प्रचारफेरीसाठी उमेदवार वाहन, ध्वनिवर्धकाचा वापर करतात. आता या वाहनासाठी स्वतंत्र परवाना घ्यावा लागणार आहे. ध्वनिवर्धकासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

ध्वनिवर्धक आणि कोणतेही वाद्य हे रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालयाच्या 100 मीटरच्या परिघात वाजविता येणार नाही. आक्षेपार्ह भाषण अथवा वक्तव्य करणे हे आचारसंहितेचा भंग समजण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

प्रचारफेरीच्या ताफ्यात तीनपेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल.

वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
प्रचारसभेच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करून एक सीडी निवडणूक निर्णय अधिकारी आणि एक सीडी संबंधित पोलिस ठाण्यात सहा तासांत द्यावी, लागेल.

Web Title: Offensive speech code of conduct violation