सिडकोच्या अधिकाऱ्यास लाचप्रकरणी अटक ; साडेसहा लाखांची लाच स्वीकारली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

सिडकोच्या नियोजन विभागात कार्यरत असलेल्या प्रियदर्शन वाघमारे याने सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात येणारे भूखंड मोक्‍याच्या ठिकाणी बसवून देण्यासाठी अनेक विकसकांकडून लाखो रुपये उकळल्याची चर्चा सिडको वर्तुळात आहे.  

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांना सिडकोच्या वतीने वितरित करण्यात येणारे साडेबारा टक्के योजनेतील भूखंड, मोक्‍याच्या ठिकाणी बसवून देण्यासाठी तब्बल 6 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सिडकोच्या नियोजन विभागातील सहयोगी नियोजनकार प्रियदर्शन वाघमारे याच्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला प्रियदर्शन वाघमारे हा सिडकोच्या नियोजन विभागात सहयोगी नियोजनकार म्हणून कार्यरत आहे. प्रकल्पग्रस्तांना सिडकोच्या वतीने देण्यात येणाऱ्या भूखंडाचे नियोजन करण्याचे काम वाघमारे करत होता. गेल्या महिन्यात एका जमीन विकसकाने प्रियदर्शन वाघमारे याच्याकडे साडेबारा टक्के योजनेतील मोक्‍याचा भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. त्या वेळी वाघमारे याने त्याच्याकडे 7 लाख रुपये लाचेची मागणी करून त्याला 2008 साली सिडकोच्या वतीने फरहान मुल्ला यांना वितरित करण्यात आलेला रोडपाली सेक्‍टर-20 मधील प्लॉट नं. 20 हा मोक्‍याचा भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर वाघमारे याने या जमीन विकसकाकडून 6 लाख 50 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली होती. 

दरम्यानच्या काळात रोडपाली सेक्‍टर-20 मधील हा भूखंड 2008 सालीच सिडकोकडून फरहान मुल्ला यांना वितरित करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर वाघमारे याने लाच म्हणून घेतलेल्या रकमेपैकी अडीच लाख रुपयांची रक्कम जमीन विकसकाला परत केली; मात्र उर्वरित 4 लाख रुपयांची रक्कम त्याला परत केली नाही. त्यामुळे या जमीन विकसकाने सिडकोच्या दक्षता विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सिडकोच्या दक्षता विभागाने केलेल्या तपासणीत प्रियदर्शन वाघमारे याने कार्यालयीन कामकाजात गोपनीयता न बाळगता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे आढळून आले.

त्यामुळे दक्षता विभागाने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर शनिवारी सायंकाळी वाघमारे याच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. चौकशीअंती त्याला अटक करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लाखो रुपये उकळले 

सिडकोच्या नियोजन विभागात कार्यरत असलेल्या प्रियदर्शन वाघमारे याने सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात येणारे भूखंड मोक्‍याच्या ठिकाणी बसवून देण्यासाठी अनेक विकसकांकडून लाखो रुपये उकळल्याची चर्चा सिडको वर्तुळात आहे.  

Web Title: Officers Taking bribe of Rs 6 lakh officer Arrested