तलावांच्या किनाऱ्यावर तेलाचे तवंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

ठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल तलाव, कोलशेत या भागातही काही प्रमाणात तेलाचा तवंग आढळून आला. त्यामुळे ठाण्यातील तलाव या छटपूजेनंतर प्रदूषित झाल्याचे दिसून आले. या प्रदूषणामुळे जलचरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.  

ठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल तलाव, कोलशेत या भागातही काही प्रमाणात तेलाचा तवंग आढळून आला. त्यामुळे ठाण्यातील तलाव या छटपूजेनंतर प्रदूषित झाल्याचे दिसून आले. या प्रदूषणामुळे जलचरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.  

ठाण्यात उत्तर भारतीय समाजाकडून ठिकठिकाणच्या तलावांत छटपूजा साजरी करण्यात आली. मात्र, याला मनसे आणि शिवसेनेने यापूर्वीच विरोध केला होता. त्यामुळे राजकीय वाद निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेचे कर्मचारी तलाव परिसरात कचरा उचलण्यासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र, तलावपाली, मासुंदा, जेल तलाव, उपवन तलावाच्या किनाऱ्यावर छटपूजा करण्यात आल्याने तलावात तेलाचे तवंग निर्माण झालेले पाहायला मिळाले. अनेकांनी निर्माल्यही तलावात टाकले. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच वेळी कचरा साफ केल्याने तलावात होणारी घाण टळली. 

येऊर येथील उपवन तलावापासून काही मीटर अंतरावर छटपूजेसाठी महापालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिला असतानाही त्याचा वापर अत्यंत कमी करण्यात आला. उपवन तलावाच्या किनाऱ्यावरून सकाळी सुमारे ५० किलोहून अधिक कचरा या भागातून उचलल्याचे कर्मचारी सांगत होते. छटपूजेच्या वेळी जळत्या पणत्यांचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे पूजेसाठी आलेल्यांनी किनाऱ्यावर या पणत्या पेटवल्या होत्या; तर मासुंदा, जेल तलाव येथे तेलाचा तवंग काही प्रमाणात दिसून आला होता. 

तलावातील पाणी वाहते नसते. या पाण्यात तेल मोठ्या प्रमाणात पडल्यास पाण्यातील जलचरांवर त्याचा परिणाम होतो. तेलामुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे जलचरांना धोका निर्माण झाला आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

तुर्फेपाडा तलावाने  कात टाकली
घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड भागात तुर्फेपाडा तलावाने मात्र कात टाकली आहे. येथील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी यापूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना तर्फेपाडा तलाव साफ करण्यासाठीचे निवेदन दिले होते. त्यानंतर एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या तलावाचे आता सुंदर तलावात रूपांतर झाले. छटपूजा झाल्यानंतर मनोहर डुंबरे यांनी महापालिकेच्या सफाई कर्मचारी व कार्यकर्त्यांना साथीला घेत तलावाची व परिसराची सफाई करून घेतली.

आम्ही छटपूजा आटोपल्यानंतर तात्काळ येथील कचरा उचलला होता. बुधवारीही काही कचरा उचलण्याचे काम सुरू होते. 
- अशोक बुरपुल्ले, उपायुक्‍त, ठाणे पालिका.

तलावात काही प्रमाणात तेल आणि धूळ साठली आहे. तलावातील पाण्याचे नमुने आम्ही घेतले आहेत. त्यावरून पाणी किती प्रदूषित होते याची माहिती मिळेल.
- मनीषा प्रधान, प्रमुख, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे पालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oil layer on the lakes in thane