ओला, उबर संपाचाही फटका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

मुंबई - ओला, उबर टॅक्‍सीचालकांचा संप आणि त्यातच मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक यामुळे आज प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रविवारी सुटी असल्याने अनेक जण फिरण्याकरिता बाहेर पडले होते. मात्र संप आणि मेगाब्लॉकमुळे त्यांची कोंडी झाली. 

मुंबई - ओला, उबर टॅक्‍सीचालकांचा संप आणि त्यातच मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक यामुळे आज प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रविवारी सुटी असल्याने अनेक जण फिरण्याकरिता बाहेर पडले होते. मात्र संप आणि मेगाब्लॉकमुळे त्यांची कोंडी झाली. 

ओला, उबर चालक-मालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले असून उद्या ते विधिमंडळावर मोर्चाही काढणार आहेत. शनिवारी सायंकाळपासूनच ओला, उबर बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. अशा स्थितीत मेरू टॅक्‍सीने पुन्हा आक्रमक जाहिरातबाजी करत आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ओला, उबर चालकांनी सकाळी सायन-पनवेल महामार्गालगत सुमारे 50 गाड्या रांगेत उभ्या करून ठेवल्या आणि ते अन्य ऍप टॅक्‍सी चालकांनाही गाड्या थांबवण्यास सांगताना दिसत होते. या सर्व गोंधळात टॅक्‍सी न मिळाल्याने वाहनांची प्रतीक्षा करत प्रवासी उन्हात ताटकळत होते. 

ओला, उबर संप आणि मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांच्या सुटीच्या आनंदावर विरजण पडले. अनेकांनी रिक्षा-टॅक्‍सीचा आधार घेत सुटी सार्थकी लावली; मात्र प्रवाशांचा सर्वाधिक भार बेस्टच्या बसवर आल्याने महत्त्वाच्या बस थांब्यांवर प्रचंड गर्दी झाली होती. मध्य रेल्वेच्या गाड्याही उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रमुख स्थानकांवरही गर्दी होती. 

उद्याच्या मोर्चात पूर्ण एमएमआर विभागातील चालक-मालक सहभागी होतील. ते बहुतांश मराठीभाषक असल्यामुळे या प्रश्‍नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घालून तोडगा काढावा. 
- महेश जाधव, अध्यक्ष, मराठी कामगार सेना. 

Web Title: ola and uber strike