कल्याण- ओला टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांमध्ये वाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

कल्याण - कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाची संख्या वाढत असून, दिवसभर रांगेत राहून व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. त्यात ओला टॅक्सी चालक स्टेशन परिसरात येऊन प्रवासी घेउन जाणे आणि सोडणे करत असल्याने ओला टॅक्सी आणि रिक्षा चालकांत वाद शिगेला पोहचला आहे. यामुळे मात्र प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

कल्याण - कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाची संख्या वाढत असून, दिवसभर रांगेत राहून व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. त्यात ओला टॅक्सी चालक स्टेशन परिसरात येऊन प्रवासी घेउन जाणे आणि सोडणे करत असल्याने ओला टॅक्सी आणि रिक्षा चालकांत वाद शिगेला पोहचला आहे. यामुळे मात्र प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मागेल त्याला रिक्षा परमिट योजना जाहीर झाल्याने अनेकांनी रिक्षा खरेदी केल्या. आता कल्याण सहित अनेक शहरात या रिक्षा ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. तीच परिस्थिती कल्याण रेल्वे स्थानक परिसरात निर्माण झाली आहे. त्यामध्ये ओला टॅक्सी प्रवाश्यांना रिक्षा पेक्षा किफायतशीर आणि सुरक्षित वाटत असल्याने त्याला मागणी आहे. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक, डी मार्ट, बेल बाजार, शिवाजी चौक, खडकपाडा सर्कल, बिर्ला कॉलेज, मेट्रो मॉल, आदी परिसरातून 150 हुन अधिक ओला टॅक्सी उभ्या रहातात. या टॅक्सी प्रवासी वाहतूक करत असल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

रिक्षा चालकांना अनेक नियम मात्र ओला टॅक्सी चालकाला कुठलेही नियम नाही, कल्याण मधून मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक आदी शहरात या ओला टॅक्सी गेले तर आमची हरकत नाही मात्र या ओला टॅक्सी चालक कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, आदी शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतूक करत असल्याने रिक्षा चालक बेरोजगार होत आहेत.  त्यांना ही कायदा लागू करत प्रवासी वाहतूक बाबत हद्द द्यावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी केली आहे. 

ओलाला आमचा विरोध नाही मात्र त्यांना ही कायदा लागू करावा. त्यांनी स्टेशन परिसरात प्रवासी उचलू नये त्यामुळे आमच्या रिक्षा चालकाच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन मागणी केली असल्याची माहिती रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी दिली. 

प्रवाश्याना ठरवू द्या कश्याने प्रवास करायचा आहे. ओला सुरक्षित आणि स्वस्त असल्याने नागरिकांची मागणी वाढली आहे. रिक्षा प्रमाणे स्टेशन परिसरात ओला टॅक्सीलाही अधिकृत स्टँड द्यावे अशी मागणी प्रवासी संघटना अध्यक्ष राजेंद्र फडके यांनी दिली. 

ओला टॅक्सी चालक शहरातुन कुठून प्रवासी घेऊ शकतो किंवा सोडू शकतो, मात्र त्यांनी रिक्षा किंवा बस स्थानक परिसरामध्ये या टॅक्सी पार्क करून प्रवासी घेऊ नये. प्रवासी वर्गाने ही त्याची काळजी घ्यावी. टॅक्सी असो रिक्षा चालकांनी ही सौजन्याने वागावे असे आवाहन कल्याण आरटीओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले आहे.

Web Title: ola taxi drivers and rickshaw drivers had a fight in Kalyan