जुना कसारा घाटातील वाहतूक अनिश्‍चित काळासाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

रस्त्याला भगदाड पडल्याने निर्णय; खोडाळा-मोखाडा प्रवाशांचे हाल

मुंबई : संततधार पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्त्याला तडे जाऊन तो खचल्याने सध्या त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता सध्या अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती ठेकेदार कंपनीने दिली आहे.

जुन्या कसारा घाटात रस्त्याच्या डावीकडील दरीची बाजू आठ ते दहा फूट खचली होती. परंतु या खचलेल्या रस्त्याची कॉंक्रीट टाकून डागडुजी करण्यात आल्यानंतर पुन्हा जोरात पाऊस सुरू झाल्याने त्याच ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला होता. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.

सध्या या रस्त्याच्या काही भागाचे नूतनीकरण करण्यासाठी सर्व रस्ता उखडण्यात आला असून अत्याधुनिक पद्धतीने या रस्त्यावर काम व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी हा रस्ता अनिश्‍चित काळापर्यंत बंद करण्यात आल्याचे संबंधित ठेकेदार कंपनीने सांगितले आहे.

येथील मार्गावर 30 फुटांहून अधिक मोठा खड्डा खोदण्यात आला असून 100 मीटर रस्ता पूर्णपणे उखडण्यात आला आहे. केवळ एक वाहन ये-जा करील इतकाच रस्ता ठेवण्यात आला असून काम सुरू असलेल्या ठिकाणापासून 50 मीटरवर रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 

आमदार बरोरा यांनी जुन्या कसारा घाटात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती धिरडे, अनिल घोडविंदे, योगेश बेनके व गणेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

जव्हार फाट्यापर्यंत एकेरी वाहतुकीची गरज 
ठेकेदाराने या घाटरस्त्यावर मातीचे ढिगारे टाकून मुंबईकडून नाशिककडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केल्याने, जव्हार फाट्यावरून खोडाळा-मोखाडाकडे जाणाऱ्या हजारो कामगार, विद्यार्थी व प्रवाशांना 12 कि.मी.चा वळसा घालून जावे लागत असल्याने त्यांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. खोडाळा-मोखाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी जव्हार फाट्यापर्यंत एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

जुन्या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला मार्ग जव्हार फाट्यावर बंद करावा; जेणेकरून या विभागातील प्रवाशांना कामनिमित्त ये-जा करता येईल व या मार्गाचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे. 
- पांडुरंग बरोरा,
आमदार 

कसारा घाटातील दुरुस्तीचे काम कायमस्वरूपी करण्यात यावे, जेणेकरून पुढच्या वर्षी हा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. 
- अब्दुल शेख,
प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old Kasara ghat traffic closed indefinitely