वृद्ध महिलेचे हातपाय बांधून लुटले घर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - कुरियर बॉय असल्याचे सांगून डॉक्‍टरच्या घरात शिरलेल्या चौघांनी चाकूच्या धाकाने वृद्ध महिलेचे हात-पाय बांधून घर लुटल्याचे उघडकीस आले आहे. ताडदेव पोलिसांनी आरोपींना डॉक्‍टरांच्या घराची माहिती देणाऱ्यांसह चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. 

मुंबई - कुरियर बॉय असल्याचे सांगून डॉक्‍टरच्या घरात शिरलेल्या चौघांनी चाकूच्या धाकाने वृद्ध महिलेचे हात-पाय बांधून घर लुटल्याचे उघडकीस आले आहे. ताडदेव पोलिसांनी आरोपींना डॉक्‍टरांच्या घराची माहिती देणाऱ्यांसह चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. 

सुरेश भरत चंद (वय 23), अर्जुन गंगाधर रावळ (24), गंगाधर ऊर्फ अजय शेट्टी (22) आणि जितेश कुमार नायक (27) अशी आरोपींची नावे आहेत. हे चौघेही मूळचे ओडिशातील रहिवासी आहेत. सर्व जण मुंबईत घरकाम आणि हॉटेलमध्ये काम करतात. गंगाधर हा तक्रारदार महिलेच्या इमारतीत एका घरात स्वयंपाकी म्हणून काम करत होता. त्यानेच आरोपींना तक्रारदार महिलेच्या घराची माहिती दिली. तिचे पती दवाखान्यात गेल्यानंतर आरोपींनी लूट केली होती. 

तक्रारदार रिटा श्रॉफ (वय 69) या ताडदेव येथील "कैटी टेरेस' इमारतीत राहतात. त्यांचे पती शरद यांचा गिरगावमध्ये दवाखाना आहे. 6 मार्चला ते दवाखान्यात गेले असता एक कुरियर बॉय त्यांच्या घरी आला. त्याने त्यांना पतीचे पार्सल आल्याचे सांगितले. त्यांनी दूरध्वनी करून विचारणा केली असता, असे कोणतेही पार्सल येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कुरियर बॉयने रिटा यांच्याकडे पाणी मागितले. त्यांनी सेफ्टी दरवाजा उघडताच आरोपी जबरदस्तीने घरात शिरला. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्यांचे तोंड दाबले. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून गळ्याला चाकू लावला. आरोपींनी साडेतीन लाखांच्या रकमेसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल लुटला होता. ताडदेव पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

सीसी टीव्हीमुळे  पटली ओळख  
तपासादरम्यान इमारतीतील सीसी टीव्हीचे चित्रीकरण तपासले. त्यातून आरोपींची ओळख पटली. त्यानंतर त्या चौघांना नुकतीच अटक करण्यात आली. आरोपींनी वाशी येथे जाऊन चोरीच्या मुद्देमालाचे वाटप केल्याचे सांगितले. कुरियर बॉय बनून घरात शिरणाऱ्या मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. चोरीतील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काही आरोपींनी त्यांच्या वाट्याची रक्कम गावी पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. 

Web Title: old lady tied up with her hands and looted the house

टॅग्स