विरार - जंजिरे अर्नाळा किल्ल्यातील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराच्या आवारातील तीन प्राचीन व पेशवेकालीन गणेशमूर्तींना कोणीतरी लाल रंगाच्या ऑइल पेंटने रंगविल्याबद्दल इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मूर्ती जपण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
"किल्ले वसई मोहीम परिवारा'तर्फे जंजिरे अर्नाळा अभ्यास शोधमोहीम पूर्ण करण्यात आली. यात अर्नाळा प्रांतीच्या जुन्या नव्या देवतांचा मागोवा घेण्यात आला. या वेळी अर्नाळा किल्ल्यातील हा प्रकार उघडकीस आला. या प्राचीन, मध्ययुगीन मूर्तींना अशाप्रकारे ऑइल पेंट फासल्याने त्यांचे मूळ स्वरूप, आभूषणे, सौंदर्य, लय, शिल्पे आदींचे विशेष लोप पावतात. पुरातत्त्व विभागाच्या अर्नाळा किल्ल्यातील कर्मचाऱ्यांनी याबाबत स्थानिक भाविकांना, युवकांना योग्य मार्गदर्शन करून या मूर्तींचे अस्तित्व जपण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी केले.
|