उल्हासनगरात प्राचीन झाडांच्या केल्या कत्तली

दिनेश गोगी
रविवार, 17 जून 2018

कल्याण मुरबाड हा शंभर फुटाचा महामार्ग उल्हासनगरातून जात आहे. या माहामार्गाच्या रुंदीकरणात येणाऱ्या तब्बल पावणेदोनशे प्राचीन झाडांच्या कत्तली करण्याचा निर्दयीपणा एमएमआरडीएच्या निर्देशावर पालिकेने केला आहे.निसर्गरम्य वातावरणाला ओसाड करण्यात आल्याचा आरोप यासंदर्भात शिवसेनेने केला आहे. तर पर्यावरण जगवण्यासाठी किंबहूना टिकवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या हिराली फाऊंडेशनने कत्तली करणाऱ्यांना धारेवर धरले आहे.

उल्हासनगर - कल्याण मुरबाड हा शंभर फुटाचा महामार्ग उल्हासनगरातून जात आहे. या माहामार्गाच्या रुंदीकरणात येणाऱ्या तब्बल पावणेदोनशे प्राचीन झाडांच्या कत्तली करण्याचा निर्दयीपणा एमएमआरडीएच्या निर्देशावर पालिकेने केला आहे.निसर्गरम्य वातावरणाला ओसाड करण्यात आल्याचा आरोप यासंदर्भात शिवसेनेने केला आहे. तर पर्यावरण जगवण्यासाठी किंबहूना टिकवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या हिराली फाऊंडेशनने कत्तली करणाऱ्यांना धारेवर धरले आहे.

एमएमआरडीएच्या वतीने उल्हासनगरात दोन शंभर फुटी महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात प्रथम कल्याण बदलापूर या माहामार्गाच्या रुंदीकरणात येणाऱ्या आठशेच्या वर व्यापाऱ्यांची दुकाने तोडण्यात आलेली आहेत. दोन वर्षांपूर्वी ही दुकाने तोडली गेली असताना अद्यापही बाधित व्यापाऱ्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून देण्यात आलेली नाही.

दुसरीकडे कल्याण मुरबाड हा माहामार्ग शंभर फुटाचा केला जात आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणात सेंच्युरी रेयॉन कंपनीची भिंत वाचवण्यासाठी दोनशे नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात येणार असल्याचे समजताच शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, विभागप्रमुख सुरेश सोनवणे, शाखाप्रमुख सुरेश पाटील, केशव ओवळेकर आदींनी आयुक्त गणेश पाटील, सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांची भेट घेऊन जाब विचारला होता. ज्यांची घरे पूर्ण बाधित होतील त्यांना पर्यायी जागा आणि कमी प्रमाणात बाधित होणाऱ्या घरांना एक मजल्याचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती. तेंव्हा कागदपत्रे सादर केल्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असे आश्वासन गणेश पाटील यांनी शिवसेनेला दिले होते.

दरम्यान, महामार्ग रुंदीकरणात येणारी पावणे दोनशेच्या वर प्राचीन सुमारे पन्नास वर्षे जुन्या झाडांच्या कत्तली निर्दयीपणे करण्यात आल्या आहेत.त्यात वड, पिंपळ, निंब, गुलमोहर या झाडांचा समावेश आहे.या झाडांमुळे जिथे निसर्गाचे वातावरण होते,तिथे ओसाड वातावरणाने जागा घेतल्याचा आरोप या परिसरातील माजी नगरसेवक दिलीप गायकवाड यांनी केला आहे.

तब्बल पावणेदोनशे प्राचीन झाडांच्या कत्तली पालिकेच्या वतीने करून न्यायालयाचे उल्लंघन करण्यात आले असून ही बाब पुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असे सरिता खानचंदानी यांनी सांगितले आहे.

याबाबत, पालिकेचे मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांच्याशी  संपर्क साधला असता, शंभर फुटाच्या महामार्ग रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने एमएमआरडीए करत आहे.त्यात येणारी झाडे तोडून द्यावीत अशी मागणी एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आली होती. त्यास पालिकेच्या वृक्षतोड समितीने मान्यता दिल्यावर ही झाडे तोडण्यात आली आहेत. महामार्गाचे काम पूर्ण होताच दुपटीने वृक्षारोपणचे काम हाती घेतले जाणार, अशी प्रतिक्रिया संतोष देहरकर यांनी व्यक्त केली.

Web Title: old tree cutting in ulhasnagar