फ्लॅट संस्कृतीत जीव रमेना!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

‘पूर्वी वृद्ध व्यक्तींना गावात मोकळेपणाने फिरता येत असे; पण शहरातील फ्लॅट संस्कृतीत सगळ्यांचे दरवाजे बंद असतात. त्यामुळे या कुटुंबातील वृद्ध व्यक्ती शेजार-पाजाराला मुकली. गाव सोडल्यानंतर कामानिमित्त तासन्‌ तास बाहेर राहावे लागलेल्यांचे मन जेथे रमत नाही.

नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या आठ गावांतील ग्रामस्थांपैकी अनेक जण शहरी भागांत राहायला गेले आहेत; पण शहरातील फ्लॅट संस्कृतीत या घरांतील वृद्ध व्यक्तींचा जीव रमत नाही. त्यापैकी अनेकांनी गावच्या आठवणींमुळे व्याकूळ होत प्राण सोडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दहा गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नाथा पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला. ‘पूर्वी वृद्ध व्यक्तींना गावात मोकळेपणाने फिरता येत असे; पण शहरातील फ्लॅट संस्कृतीत सगळ्यांचे दरवाजे बंद असतात. त्यामुळे या कुटुंबातील वृद्ध व्यक्ती शेजार-पाजाराला मुकली. गाव सोडल्यानंतर कामानिमित्त तासन्‌ तास बाहेर राहावे लागलेल्यांचे मन जेथे रमत नाही. तेथे वृद्धांचे काय रमणार? आमच्या कोपर गावातील कमलाकर पिंगळे, रमाबाई पवार, जानूबाई पाटील आदी वृद्ध व्यक्तींनी काही महिन्यांत गावच्या आठवणींमुळे व्याकूळ होऊन प्राण सोडले, असे ते म्हणाले.

चिंचपाडा गावातील चंद्रभागा मुंडकर (८५) यांचे २ जानेवारीला निधन झाले. जुन्या घरातच राहण्याच्या हट्टाने त्या अनेकदा नवे घर सोडून तेथे धाव घ्यायच्या. त्यांचे पुत्र शरद म्हणाले, ‘शहरातील घरांच्या चार भिंतींत आईला करमायचे नाही. गावाकडे शेजार होता. गप्पा मारणारी, सुख-दुःख वाटून घेणारी चार माणसे होती. कधीही गावात फेरफटका मारून येत होते. शहरात तसे नाही. जेथे आमच्या कुटुंबातील अनेक पिढ्या जगल्या, तेथील आठवणी इतक्‍या सहज विसरणे तिला शक्‍य झाले नाही. गावातील राहते घर गेल्याने ती तणावाखाली असायची. तिला कोणताही आजार नव्हता. अचानक पक्षाघातामुळे ती गेली.

१३ जानेवारीला नारायण गोंधळी यांचा मृत्यू झाला. सिडकोने ४० वर्षांत ताब्यात घेतलेल्या त्यांच्या जमिनीचा मोबदला अजूनही दिलेला नाही. राहते घर सोडण्याची नोटीस सिडकोने बजावल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. सहा महिने ते सिडको कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते. नुकसानभरपाई नाहीच. आता राहते घरही जाणार, या धक्‍क्‍याने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.’ 

त्यांच्या पत्नी राधाबाई म्हणाल्या, ‘आमची पावणेपाच एकर जमीन सिडकोने ताब्यात घेतली. त्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. सिडकोने करंजाडे सेक्‍टर एकमध्ये ‘प्लॉट’ दिला आहे. तोही माझ्या एका खोलीएवढा. त्यात माझ्या चार मुलांचे कुटुंब कसे राहणार, पुढे काय होणार, या काळजीने माझे पती रात्रभर झोपायचे नाहीत. त्यांना कसलाच आजार नव्हता. रक्ताचे पाणी करून उभारलेले घर मातीमोल होणार, या धसक्‍याने त्यांनी जीव गमावला.’

गावाशी जोडलेली नाळ तुटेना
कोलही गावातील नामदेव करावकर (९८) यांचे अलीकडेच निधन झाले. या वयातही ते ठणठणीत होते. ते एका जागी बसून नसत. शेतावर फेरफटका मारणे, मंदिरात जाणे असा त्यांचा दिनक्रम असे. आम्ही गाव सोडल्यानंतर मात्र त्यांनी अंथरूण धरले. महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. गाव सोडल्याने आमचे राहणीमान सुधारेल; पण भावनिकदृष्ट्या गावाशी जोडलेली नाळ अशी सहज सुटणे शक्‍य नाही. आमच्या गावाची, तेथील निसर्गाची, संस्कृतीची सर कशालाच येणार नाही, असे त्यांचे पुतणे पांडुरंग म्हणाले.

Web Title: Older people do not live in flat culture in the city