शिंदेशाही की कलानीशाही?

मयूरी चव्हाण-काकडे - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांत उल्हासनगरमधील लढतीकडे सर्वांचे खास लक्ष आहे. ओमी कलानी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी निर्माण केलेला युडीएचा पर्याय आणि भाजपने सोडलेली शिवसेनेची साथ. यामुळे शहरातली खरी लढत ओमी कलानी विरुद्ध पालकमंत्री एकनाथ शिंदे अशीच होणार आहे. इथल्या प्रचारात शिवसेनेने आक्रमकपणा घेतला असून सोशल मीडियावर ओमींविरुद्ध खिल्ली उडवणारी व्यंगचित्रे फिरत आहेत. दुसरीकडे ओमीकडून या आक्रमकतेला काहीच प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. 

उल्हासनगरचे राजकारण नेहमी कलानी कुटुंबाभोवती फिरत राहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी शहरात शिवसेनेचे प्राबल्य निर्माण करून कलानीशाहीला ‘काँटे की टक्कर’ दिली आहे. आताच्या पालिका निवडणुकीत खरी लढत या दोघांत होणार आहे. एकीकडे भाजपच्या वतीने ओमी; तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. गत निवडणुकीत कलानी राष्ट्रवादीचे आधारस्तंभ होते. त्यामुळे पक्षाला २० जागा मिळाल्या; तर शिवसेनेचेसुद्धा २० नगरसेवक निवडून आले होते. साई पक्षाला गळाला लावण्यात शिंदे यांना यश आले होते. त्यामुळे निकालानंतर घोडेबाजार करण्यात शिंदे बाजी मारतात की कलानी, हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

आजवर येथे भाजपने नेहमी शिवसेनेच्या साथीने सत्तेचा उपभोग घेतला. शिवसेना नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली; मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवून आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपने थेट ओमीशी घरोबा केला. परंतु ओमीच्या जीवावर महापौरपद आणि मोठा भाऊ होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला ओमीचा उमेदवारी अर्ज बाद  झाल्याने मोठा धक्का बसला. 

अगोदरच्या निवडणुकीत उल्हासनगरमधील पप्पू कलानीचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी एकनाथ शिंदे रणांगणात उतरले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने २००५ नंतर शिवसेनेला येथे अच्छे दिन आले.  यंदा ओमीची ढाल वापरून भाजप राजकीय आखाड्यात उतरला असला, तरी  पुन्हा कलानी आणि शिंदे  यांच्यातच खरी लढत आहे.

ओमीचे व्हिजन नागरिकांसमोर 
ओमींशी भाजपची जवळीक रिपब्लिकनला पटली नाही. त्यांनी भाजपची साथ सोडून शिवसेनेशी घरोबा केला. ओमी यांनी भाजपशी घरोबा करण्यापूर्वीच सोशल मीडियावर उल्हासनगरचे व्हिजन नागरिकांसमोर मांडण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे शिवसेनेने आक्रमकपणे प्रचार सुरू केला आहे. उल्हासनगरच्या गुंडगिरीवर बोट ठेवून थेट ओमीवर बाण सोडले, तरी त्याने शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला दिसत नाही. व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही  शिवसेनेने  कलानी आणि भाजपवर खरमरीत टीका केली आहे.

Web Title: omi kalani vs eknath shinde