'संभाजी'तील कलाकाराच्या नावाचा गैरवापर करून गंडा; एकाला अटक

दीपक शेलार
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

चित्रपट, मालिका तसेच जाहिरातीमध्ये काम मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून शेकडो उद्योन्मुख कलाकारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास वागळे इस्टेट गुन्हे शाखेने अटक केली आहे.

ठाणे : चित्रपट, मालिका तसेच जाहिरातीमध्ये काम मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून शेकडो उद्योन्मुख कलाकारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास वागळे इस्टेट गुन्हे शाखेने अटक केली आहे. संबंधित व्यक्ती संभाजी मालिकेतील कलाकाराच्या नावाचा गैरवापर करत असल्याचेही समोर आले.

संदीप व्हरांगळे (32) रा.रोझा गार्डन,घोडबंदर रोड असे त्या भामट्याचे नाव असून, त्याने मुंबई, ठाणे आदी परिसरातील शेकडो उद्योन्मुख कलाकारांकडून तब्बल 10 ते 15 लाख उकळल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी दिली. विविध ठिकाणी 17 गुन्हे दाखल असलेल्या या भामट्याला ठाणे न्यायालयाने 9 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.    

डोंबिवलीत राहणारे रवींद्र कुलकर्णी यांच्या अद्वैत या मुलाला चित्रपट, मालिकेत अथवा जाहिरातीत काम मिळवून देण्यासाठी पोर्टफोलिओ तयार करण्याकरिता या भामट्याने 11 हजार रूपये बँक खात्यात जमा करण्यास लावले होते. परंतु,त्याने काम तर मिळवून दिले नाहीच. पण पोर्टफोलिओ आणि रक्कमदेखील परत न केल्याने कुलकर्णी यांनी पोलिसांकडे तक्रारअर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कुलकर्णी यांच्याप्रमाणेच अन्य काही जणांना अशाच प्रकारे 4 लाख 75 हजाराना फसवल्याचे समोर आले. त्यानुसार वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संदीप व्हरांबळे उर्फ सँडी याला पोलिसांनी अटक केली.

या भामट्याच्या प्रलोभनाला भुलून विक्रोळी व चेंबूर येथील महिलांना दापोली येथे चित्रीकरणाच्या बहाण्याने नेऊन चित्रीकरण न करता हॉटेलचेही बिल भरले नाही. शिवाय चित्रीकरणाच्या ठिकाणी येऊन सर्वाकडून रक्कम स्वीकारल्यावर धूम ठोकून आपला नंबरदेखील सतत बदलत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याने विविध ठिकाणी असे प्रकार केले असून त्याच्यावर मुंबई,ठाण्यासह पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी आणि गोवा राज्यातही अशाप्रकारचे 17 गुन्हे दाखल आहेत. त्याने आत्तापर्यंत 100 ते दीडशे उदयोन्मुख कलाकारांची 10 ते 15 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

संभाजी मालिकेतील कलाकाराच्या नावाचा गैरवापर
 
संदीप व्हरांगळे या भामट्याने विषेशतः महिला व गृहिणींना लक्ष केले होते. प्रत्येक महिलेला आपली मुले चित्रपट, मालिका आणि जाहिरातीत चमकावी, असे वाटत असल्याचा गैरफायदा त्याने उचलला. यासाठी त्याने टीव्हीवर गाजत असलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील आवजी चिटणीस हे पात्र सादर करणारे विकास महाजन यांच्या नावाशी साधर्म्य असलेले स्वप्नील महाजन हे नाव धारण केले होते.

प्रत्येकाला तो विकास महाजन यांच्या कुटुंबातील असल्याचे भासवून आपल्या जाळ्यात ओढत असे. मात्र,त्याचे बिंग त्याच्या बँक खात्याने फोडले. रक्कम जमा करण्यासाठी त्याने दिलेल्या बँकेच्या खात्यावरील नाव महाजन नसून, व्हरांगळे असल्याचे उघड झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested for Misuse of Swarajyarakshak Sambhajis Artist Name did Fraud