एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - चलनातून रद्द झालेल्या एक कोटीच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोघांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरेगावहून एक जण नोटांची अदलाबदल करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मुकेश डगे, पोलिस शिपाई राजेंद्र कंटे यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. फाटलेल्या चित्रपटाच्या तिकिटाच्या खुणेने चित्रा सिनेमाजवळ ही देवाणघेवाण होणार होती. हा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या आरोपींजवळ पोलिसांना एक कोटींच्या रद्द झालेल्या नोटा सापडल्या. पोलिसांनी याबाबत प्राप्तिकर अधिकाऱ्यांना माहिती दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या आधीही कंटे यांना मिळालेल्या माहितीद्वारे रद्द झालेल्या 83 लाखांच्या जुन्या नोटा पकडण्यात आल्या होत्या.
Web Title: one caror old currency seized