एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

चार बांधकाम व्यावसायिकांना अटक

चार बांधकाम व्यावसायिकांना अटक
मुंबई - नोटाबंदीनंतरही काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या चार बांधकाम व्यावसायिकांकडून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा मंगळवारी (ता. 21) जप्त केल्या. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. चार बांधकाम व्यावसायिकांकडे 500 व हजाराच्या जुन्या नोटा असल्याची माहिती वरळी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पडताळणी करून, त्यांना नोटा बदलून देण्याचे प्रलोभन देऊन वरळीतील गांधी नगरमध्ये बोलावले. तेथे पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात ते अडकले.

त्यांच्याकडून एक कोटी चार लाखांच्या 500 व हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. या रकमेबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्याबाबत त्यांना कोणतीही माहिती देता आली नाही. त्यामुळे चौघांनाही पोलिसांनी अटक केली. याबाबतची माहिती प्राप्तिकर विभागालाही देण्यात येणार आहे.

यापूर्वी 11 फेब्रुवारीलाही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दक्षिण मुंबईत सापळा रचून एका सराफाकडून 63 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या होत्या. त्या प्रकरणी तिघांना अटकही करण्यात आली होती.

Web Title: one crore old currency seized