महाडमध्ये एकाची हत्या; 13 जणांविरोधात गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

महाड तालुक्‍यातील साकडी गावामध्ये दोन कुटुंबांतील वादातून झालेल्या हाणामारीत एकाची हत्या झाली आहे; तर एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी (ता. 1) रात्री ही घटना घडली.

महाड : महाड तालुक्‍यातील साकडी गावामध्ये दोन कुटुंबांतील वादातून झालेल्या हाणामारीत एकाची हत्या झाली आहे; तर एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी (ता. 1) रात्री ही घटना घडली. घटनेमुळे साकडी मोहल्ल्यात तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड औद्योगिक पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. 

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव मोहिद्दीन हुर्जुक असे आहे आणि ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे या विभागातील कार्यकर्ते होते. धनसे आणि हुर्जुक या दोन कुटुंबांत वाद झाला. महाड औद्योगिक पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार- येथील इब्राहिम धनसे हे आजारी असल्याने मोहिद्दीन हुर्जुक व त्यांचा मुलगा समीर हे त्यांना पाहण्यासाठी गेले होते. परंतु त्यांना पाहताच धनसे यांनी शिवीगाळ केली. त्याचा जाब हुर्जुक यांनी विचारल्यावरून पेटलेल्या वादातून लाठ्यांनी हाणामारी झाली. या हाणामारीत मोहिद्दीन हुर्जुक यांचा जागीच मृत्यू झाला. 

नातेवाईकांच्या पवित्र्याने तणाव 

दरम्यान, मोहिद्दीन यांचे शव महाड ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. शवविच्छेदनानंतर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शव ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तिथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

अखेर पोलिसांनी मुबारक धनसे, फातिमा अंतुले या दोन महिलांसह अजगर धनसे, तौफिक धनसे, परवेझ धनसे, मुबीन धनसे, अकिब धनसे, कमाल धनसे, सुयेब धनसे, नबील धनसे, मुअज्जम धनसे, सकलेन धनसे, झुल्फिकार अंतुले अशा 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील फिर्यादी समीर हाही या हाणामारीत जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महाडचे पोलिस उपविभागीय अधिकारी दत्ता नलावडे, पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनीदेखील या ठिकाणी तत्काळ भेट दिली. 
 

Web Title: One killed in Mahad FIR Registered on 13 Peoples