रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे 15 दिवसात जमा केले एक लाख लिटर पाणी

Kharghar Rain Water Harvesting
Kharghar Rain Water Harvesting

खारघर : खारघर वसाहतीत पावसाळ्यात आजही काही भागात पाणी टंचाई जाणवते. मात्र खारघर सेक्टर अकरामधील एका इमारतीच्या छतावर पडून वाया जाणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या माध्यमातून जमा करून गेल्या पंधरा दिवसात एक लाख लिटर पावसाचे पाणी सोसायटीच्या टाकीत साठविले आहे. साठविलेल्या पाण्याचा उपयोग दैनंदिन कामासाठी करीत पाणी टंचाईवर मात केली आहे. हा प्रकल्प गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे.

पावसाचे बहुतांश पाणी हे वाहून जाते. आणि त्यानंतर पाणी टंचाईच्या नावाने नागरिक ओरड करीत बसतात. मात्र, खारघरमधील नटराज सोसायटीच्या सदस्यांनी पाणी टंचाईवर मात करून पावसाळ्यात कोसळणारे पाणी साठवून ते दैनंदिन कामासाठी वापरत आहेत. या प्रकल्पाविषयी सोसायटीचे सदस्य प्रकाश शेट्टी म्हणाले, दहा वर्षांपूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खारघरमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. तेव्हा अनेकांनी अवाच्या सव्वा पैसे देऊन टँकरने पाणी विकत घेऊन गरजा पूर्ण केल्या होत्या.

त्यानंतर शेट्टी यांनी सोसायटीच्या सदस्यांना एकत्र केले. सोसायटीला दररोज दहा हजार लिटर पाण्याची गरज आहे. त्यात नुकताच  पावसाळा सुरू झाला असून पावसात पडणारा शुद्ध पाणी इमारतीच्या छतावर साठणारे पाणी सोसायटीच्या दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या टाकीत साठवून त्याचा उपयोग दैनंदिन कामासाठी केल्यास योग्य ठरेल, तीन महिने पाण्याची कोणत्याही प्रकारची टंचाई जाणवणारी नाही. हा प्रकल्प सोसायटीचे अध्यक्ष राकेश वर्मा आणि सदस्यासमोर   मांडल्यावर सोसायटीच्या सदस्यांनी एकजूट दर्शविली. शेट्टी यांनी केवळ दोन हजार रुपये खर्च करून छतावरून थेट पाण्याचा टाकीत पाईप जोडणी करून दोन दिवसांत हा प्रकल्प उभा केला. तसेच साठवलेले पाणी पिण्यायोग्य असल्याचे एका प्रयोग शाळेतून चाचणी करून घेतली.

गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकल्प यशस्वीपणे सुरु असून दरवर्षी पावसाळयात सोसायटीत पावसाळ्यात तीन ते साडे तीन लाख लिटर पाणी बचत करून त्याचा उपयोग करीत असते. या कालावधीत सिडकोच्या पाण्याचा उपयोग करीत नाही.

सोसायटीच्या छतावर आवारात वीस हजार लिटर तर छतावर सोळा हजाराची पाण्याची टाकी आहे. या दोन्ही टाक्यात पाणी साठवले जाते. या शिवाय आवारात चौदा हजार लिटर पाणी साठवून ठेवण्यासाठी एक विहीर खोदली आहे. छतावरील पाणी टाकी आणि विहिरीत साठविले जाते. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास आवश्यक तेवढे पाणी साठवून अतिरिक्त पाणी बाहेर सोडले जाते. या प्रसंगी दोन्ही टाकी रिकामी झाल्यास विहिरीतील पाण्याचा उपयोग केला जातो. सोसायटीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना या प्रकल्पाविषयी योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले असून सदस्यांच्या गैर हजेरीत सुरक्षा रक्षक हे काम पाहतात. 

स्वच्छ आणि हिरवळ सोसायटी
सोसायटीच्या आवारात चारही बाजूने मोठमोठी झाडे आहे. आवारातील कचरा,पाला पाचोळा एकत्र करून परिसरात मोकाट गाई गुरांचा शेण गोळा करून त्याचा उपयोग  शेंद्रीय खत तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.  उन्हाळ्यात विहिरीचे  पाणी झाडांना दिले  जाते.त्यामुळे सोसायटी उन्हाळ्यात गारवा जाणवतो. 

सोसायटीने उभारलेले रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प चांगला आहे. पाणी बचत ही काळाची गरज असून आमच्या सोसायटीत आणखी एक प्रकल्प उभारणार आहे. 
- रमेश मेनन, रेणुका सोसायटी 

पाणी बचत ही काळाची गरज आहे. नटराज सोसायटीने दोन हजारात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारल्याचे ऐकून समाधान वाटते.
- लीना गरड, स्थानिक नगरसेविका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com