लंघूशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू

दिनेश गोगी
गुरुवार, 16 मे 2019

- वायरचा शॉक लागून झाला मृत्यू.

उल्हासनगर : लघुशंकेसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा उघड्या ट्रान्सफार्मरने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उल्हासनगरात घडली. लघुशंका करताना वायरचा शॉक लागल्याने ही व्यक्ती जागीच मृत्यूमुखी पडली असून, या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हरनाम गोपीचंद्र डिंग्रा असे 54 वर्षीय संबंधित व्यक्तीचे नाव आहे. हरनाम गोलमैदान परिसरात राहत होता. दुपारी साडे बाराच्या सुमारास हरनाम लघुशंका करण्याकरीता मधुबन चौक येथील नॅच्युरल आईस्क्रिम सेंट्रलजवळ असलेल्या उघड्या विद्युत ट्रान्सफार्मरच्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्यांना विद्युत वाहिनींचा जबरी शॉक लागून ते जागीच खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे यांच्या मार्गदर्शनाखली महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुपमा खरे करीत आहेत.

दरम्यान, ट्रान्सफार्मरच्या जाळीचा दरवाजा उघडा असल्याने ही घटना घडल्याने विद्युत विभागाच्या या कारभारावर नागरिकांनी संताप्त व्यक्त केला आहे. 

Web Title: One Person Died in Ulhasnagar Due to Electricity Shock