‘आंबेनळी घाट’ शब्दामुळे अंगावर येतो काटा...

पाेलादपूर : आंबेनळी घाटात दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना रविवारी नागरिकांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
पाेलादपूर : आंबेनळी घाटात दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना रविवारी नागरिकांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुंबई : दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना महाबळेश्वरला घेऊन जाणारी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात आठशे फूट दरीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. २८ जुलैला या अपघाताला एक वर्ष पूर्ण झाले आहे. घटनेनंतर आजही घाटांमध्ये प्रवास करताना अनेकांचे मन विचलित होते. अनेकांच्या अंगावर काटा येतो.

पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये त्या वेळी वाजणाऱ्या सायरनचा आवाज कानात गुंजतो. मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशांची हृदय पिळवटून टाकणारी ती दृश्‍य अजूनही अनेकांना विसरता येत नाहीत. दापोली येथील कोकण कृषी महाविद्यालयांमध्ये काम करणारे ३१ कर्मचारी सहलीसाठी महाबळेश्वर येथे निघाले होते. २८ जुलैला सकाळी सव्वाअकराच्या सुमारास चालकाचा या खासगी बसवरील ताबा सुटल्याने बस थेट ८०० फूट दरीत कोसळली. मदतकार्य करण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. महाबळेश्वर ट्रेकर्स, महाडचे सह्याद्री मित्र संस्था, सिस्केप, पोलादपूर येथील विविध संस्था या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. खोल दरीत सर्वच मृतदेह बाहेर काढताना गिर्यारोहकांनी अहोरात्र केलेले काम अंगावर काटा उभा करणारे होते. आव्हान स्वीकारत गिर्यारोहकांनी आणि एनडीआरएफने केलेली मदत मोलाची होती.

महाडच्या चिंतन वैष्णव यांनी तब्बल १६ तास दरीत आणि बाहेर मदतकार्य केले. आंबेनळीसारखी दुर्घटना विसरता येणे शक्‍यच नाही, अशी प्रतिक्रिया चिंतनने व्यक्त केली. कॉल आल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. तातडीने कामाला लागलो. खाली उतरणे खूपच कठीण होते; तरीही कशाचीच पर्वा न करता आमचा ग्रुप दरीमध्ये उतरला. या बसमध्ये नक्की किती प्रवासी होते, याचा काहीच अंदाज नव्हता. दिवसभरामध्ये खडतर काम करत आम्ही १४ मृतदेह बाहेर काढले. या वेळी सर्व गिर्यारोहण आपल्याला पडेल ते काम पार पाडत होते, असे चिंतनने सांगितले.

कॉल आल्यानंतर १५ जणांचा गट या ठिकाणी दाखल झाला होता. महाबळेश्वर ट्रेकर्सनी या ठिकाणी रोप लावून आपले काम सुरू केले होते. आम्ही आमच्या वेगवेगळ्या यंत्रणा या ठिकाणी वापरल्या आणि काम सुरू केले होते, असे सिस्केप संस्थेचे योगेश गुरव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com