फळे-डाळींपेक्षा कांदा महाग

सकाळ वृत्तसेवा
05.18 AM

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात मागील अनेक वर्षांत प्रथमच कांद्याचा दर हा ८५ ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात हाच दर १५० ते १६० रुपये प्रतिकिलोच्या घरात आहे. त्यामुळे फळे व डाळींपेक्षा कांद्याचा भाव अधिक असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात मागील अनेक वर्षांत प्रथमच कांद्याचा दर हा ८५ ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात हाच दर १५० ते १६० रुपये प्रतिकिलोच्या घरात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. कांद्याची आवक देखील कमी झाली असल्याने दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, फळे व डाळींपेक्षा कांद्याचा भाव अधिक असल्याचे दिसून येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी बाजारात १० ते १५ रुपये प्रतिकिलो असणारा कांदा, सध्या घाऊक बाजारात शंभरीच्या खाली मिळत नाही. त्याचवेळी एरवी १२० ते १५० रुपये प्रतिकिलोने मिळणारे सफरचंद आवक वाढल्याने ६५ ते ९५ रुपये प्रतिकिलोच्या घरात मिळत आहे. त्यामुळे कांद्यांना आता सफरचंदाचा भाव आला असल्याचे दिसून येत आहे. सीताफळही ४५ ते ७५ रुपये प्रतिकिलोच्या घरात आहे. डाळिंबही ४० ते ८० रुपये किलो आहे. यामुळे फळांपेक्षा कांद्याने भाव खाल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे झालेले नुकसान आणि त्यानंतर निर्माण झालेली टंचाई यामुळे बाजारात कांद्याचे दर गंगनाला भिडले आहेत. बुधवारी (ता.४) बाजारात कांद्याची आवक नेहमीच्या मानाने ५० टक्‍क्‍यांनी कमी आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळत नसल्याने ही दरवाढ सुरू आहे. पहिल्यांदाच बाजारात धान्य, फळे व भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक किंमत कांद्याला मिळू लागली आहे. सद्यस्थितीमध्ये घाऊक बाजारात उडीद डाळ ६७ ते ८७ रुपये, मूगडाळ ८२ ते ९८, तूरडाळ ७२ ते ९०, वाटाणा ७२ ते ९० रुपये प्रतिकिलो आहे. मात्र, कांद्याचा दर हा शंभरी पार झाला आहे. कांद्याच्या भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

आवक कमी असल्याने कांद्याची मागणी पूर्ण करणे बाजारात शक्‍य होत नाही आणि त्यामुळे दर वाढण्यास सुरुवात होत आहे.
- सुभाष शेळके, व्यापारी.

डाळीचे दर (रुपये/प्रतिकिलो)
उडीद डाळ ६७ ते ८७ रुपये
मूगडाळ ८२ ते ९८ रुपये
तूरडाळ ७२ ते ९० रुपये
वाटाणा ७० ते १०० रुपये

फळांचे दर ( रुपये/प्रतिकिलो) 
सफरचंद ६५ ते ९५ 
डाळिंब ४० ते ८० 
मोसंबी ४० ते ५२ 
पेरू ४० ते ५५ 
सीताफळ ४५ ते ७५ 
संत्री ३५ ते ५० 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion is more expensive than fruit-pulses