कांदा-बटाटा मार्केट 1 जूनपासून बंद 

कांदा-बटाटा मार्केट 1 जूनपासून बंद 

तुर्भे - खांबांना गेलेले तडे, कोसळलेला स्लॅब, जीर्ण बांधकाम आदी समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची कांदा-बटाटा मार्केटची इमारत प्रशासनाकडून अतिधोकादायक घोषित करण्यात आली आहे. या मार्केटचा वापर थांबवून ते तत्काळ खाली करण्याची नोटीस बाजार समितीने व्यापाऱ्यांना बजावली असून, येत्या 1 जूनपासून मार्केट बंद केले जाणार असल्याचे कळविले आहे. बाजार समितीच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

मुंबईमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारने मुंबई बाजार समितीमधील पाच मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय 1980 च्या दशकात घेतला. 1981 मध्ये सर्वप्रथम कांदा-बटाटा मार्केट स्थलांतर करण्यात आले. सिडकोने येथील पाचही मार्केटचे बांधकाम केले. 1982 साली सिडकोकडून कांदा-बटाटा मार्केटचे बाजार समितीकडे हस्तांतरण करण्यात आले; पण बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याने 21 वर्षांमध्ये मार्केट धोकादायक बनले. येथील इमारतीच्या खांबाना तडे गेले असून, छताचे प्लास्टरही कोसळू लागले आहे. वारंवार छताचा भाग कोसळू लागल्यामुळे मार्केटचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. अखेर 2003 साली महापालिकेने काही विंग धोकादायक घोषित केल्या. 2005 मध्ये बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज यांनी बाजार समितीकडे पाठपुरावा करत त्यावेळी पुनर्बांधणीचा निर्णयही घेतला गेला होता; पण व्यापारी संघटना न्यायालयात गेल्यामुळे हा प्रश्‍न रखडला होता. अखेर 2005 मध्ये न्यायालयाने एल आकारामध्ये मॉल उभारावा व उर्वरित जागेमध्ये व्यापाऱ्यांना मोफत व अत्याधुनिक सुविद्युक्त मार्केट उभारून द्यावे, असे आदेश दिले होते; परंतु त्यानंतरही विविध अडथळ्यांमुळे मार्केटची पुनर्बांधणी रखडली असून, सद्यस्थितीमध्ये संचालक मंडळ नसल्याने न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रशासकीय मंडळाला मनाई केली आहे. 

इकडे आड तिकडे विहीर 
बाजार समितीने शुक्रवारी (ता. 22) मार्केटचा वापर थांबविण्याची नोटीस व्यापाऱ्यांना दिली आहे. दोन्ही प्रवेशद्वारावर फलकही लावले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. यावर बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना ओकॅशन हॉल व म्याफको मार्केटमध्ये असलेल्या दोन एकर जागेत पर्यायी व्यवस्था केली आहे; मात्र व्यापारी त्या ठिकाणी जाण्यास तयार नसल्याने व्यापारी वर्गाची इकडून आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यात अनेक व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने गाळ्यांवर शेड टाकले आहे. माल ठेवायच्या जागेच्या वरील छत कोसळू नये, यासाठी लोखंडी खांबांचे टेकू देण्यात आले आहेत. आवश्‍यक तिथे प्लास्टरही केले आहे; परंतु संपूर्ण मार्केटचीच स्थिती बिकट झाली असून, टेकू लावायचे तरी कुठे व किती, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सर्वाधिक असुरक्षिततेची भावना माथाडी कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कामगारांचा वावर असलेल्या ठिकाणी छतामधील लोखंड दिसू लागले आहे. प्लास्टर वारंवार कोसळत आहे. अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी पुनर्बांधणीचा प्रश्‍न मार्गी लागावा, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली. 

बाजार समितीकडे फंड नसल्यामुळे व ठोस असे नेतृत्व नसल्याने पुनर्बांधणीचा प्रश्‍न रखडला आहे. त्यात बाजार समितीकडून 1 जूनपर्यंत जुन्या इमारतीमधील व्यवहार बंद करण्याची नोटीस बजावली असल्याने याबाबत व्यापारी वर्ग नाराज असून, स्थलांतरित करण्यात येणाऱ्या ठिकाणी जाण्यास विरोध आहे. लवकरच बाजार समितीच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करत तीव्र आंदोलन छेडले जाईल. 
- अशोक वाळुंज, माजी संचालक, एपीएमसी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com