घाऊक बाजारात कांद्याच्या दरात चढ-उतार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या वाढत्या दराने बाजार हादरून गेला आहे. दिवाळीनंतर नवीन कांद्याची चांगली आवक होऊन, बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, नवीन कांद्याचे आवक सुरू होऊनही, दरात कोणतीही घसरण झाली नाही. वाशीतील घाऊक बाजारात कांद्याच्या दरात रोज चढ-उतार होत आहे. मात्र, किरकोळ बाजारात दर चढेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. 

नवी मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याच्या वाढत्या दराने बाजार हादरून गेला आहे. दिवाळीनंतर नवीन कांद्याची चांगली आवक होऊन, बाजार सावरण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, नवीन कांद्याचे आवक सुरू होऊनही, दरात कोणतीही घसरण झाली नाही. वाशीतील घाऊक बाजारात कांद्याच्या दरात रोज चढ-उतार होत आहे. मात्र, किरकोळ बाजारात दर चढेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. 

घाऊक बाजारात शुक्रवारी कांद्याला (ता.८) ४५ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला, तर सोमवारी (ता.११) यामध्ये वाढ होऊन ५५-६५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला. बुधवारी (ता.१३) यामध्ये घसरण होऊन, तो ४५-५५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला आहे. घाऊक बाजारातील दरामध्ये चढ-उतार होत असताना, किरकोळ बाजारात मात्र, कांदा डोळ्यातून पाणी काढत आहे. भाव वाढत असूनही कांद्याच्या मागणीत मात्र कोणतीही घट होत नाही. त्यामुळे सध्या बाजारात प्रत्येक दोन दिवसांनी दरात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतात लावलेला कांदा बाहेर काढण्याआधीच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर बाजारात अपेक्षित असलेला कांदा बाजारात येऊ शकलेला नाही. जो काही नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे, तो कांदा ओलाच असून, पूर्णपणे पाण्यात भिजलेला आहे. बाजारात आलेला हा ओला कांदा जास्त दिवस टिकेल, अशी परिस्थितीही नाही. त्यामुळे बाजारात चांगला सुका, जुना कांदा फारच कमी प्रमाणात येत आहे. जो काही येत आहे. त्याला मागणी असल्याने त्याच्या दरात दर दोन दिवसांनी वाढ होत आहे.

मागील महिन्यात ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर असलेला जुना, सुका कांदा सोमवारी बाजारात ४५-५५ रुपये किलोचा दर ओलांडून ५५-६५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला. मात्र, बुधवारी यामध्ये घसरण होऊन पुन्हा तो ४५-५५ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला.
-प्रकाश उंडे, व्यापारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices up-down in the wholesale market