कांद्याच्या दिवसागणिक वाढत्या दराने गृहिणी रडकुंडीला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

वसई ः शेतकरी राजा, मच्छीमार अवकाळी पावसाने संकटात आला असताना आता गृहिणींनादेखील बजेटची चिंता भेडसावू लागली आहे. चहातल्या आल्यापासून लसूण, कोथिंबीर आणि अन्य भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यातल्या त्यात ओला वाटाणा थोडा स्वस्त झाला असून त्याचेच पदार्थ करण्याकडे गृहिणींनी मोर्चा वळवला असून रोज जेवणात करायचे तरी काय, असा प्रश्‍न त्यांना सतावत आहे.

दिवसेंदिवस भाजीपाल्यासह कांद्याचे दर वाढतच असल्याने आता भाजी मंडईत जाताना दर पाहूनच घाम फुटत आहे. रुचकर पदार्थ तर सोडा; मात्र रोजच्या आहारात वापरली जाणारी कोथिंबीर, जेवणाला आस्वाद यावा, यासाठी फोडणीसाठी वापरली जाणारी लसूण, चहाला स्वाद येण्यासाठी घातले जाणारे आलेदेखील महाग झाले आहे. गेल्या आठवड्यात २०० रुपये किलो असणारा वाटाणा मात्र ८० रुपयांनी घसरला आहे. फ्लॉवर, भेंडी, कोबी, वांगी, कांदा, डोळ्यातून पाणी आणत आहे. मिरचीचा भावही तिखट झाला असून, कारले खरेदी करतानाही विचार करावा लागत आहे. 

अवकाळी पावसाने मच्छीमारांचे, शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. वसई-विरारमध्ये बाहेरून येणाऱ्या भाज्यांचा भाव वाढला आहे. नवी मुंबई, नाशिक, पुणे आदी भागातून येणाऱ्या भाजीची आवक घटली आहे. त्यातच इंधन दरवाढ, वाहनभाड्यात वाढ झाल्यामुळे वसई, विरारमध्ये भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. याचा परिणाम थेट सामान्य ग्राहकांवर झाल्याचे दिसत आहे. 

भाज्यांचे दर किलोमध्ये
वांगी - ८० रुपये 
मिरची -  ८०
आले - १२०
वाटाणा - १२०  
कारले -  ८०
भेंडी - ८०
कांदा - ८०
कोथिंबीर छोटी जुडी - ५० रुपये
लसूण - २०० रुपये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion rates increase day by day in Vasai