ठाण्यातील कांदे सीसी टीव्हीच्या निगराणीत 

कांदा व्यापाऱ्यांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे
कांदा व्यापाऱ्यांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे

ठाणे : एरवी क्षुल्लक वाटणारा कांदा आजघडीला मौल्यवान जिन्नस बनला आहे. कांद्यांची दरवाढ गगनाला भिडल्याने ग्राहक चिंतेत पडले असताना महागड्या कांद्याच्या चोरीचे प्रकार घडण्याची भीती व्यापारी वर्गाला भेडसावू लागली आहे. या कांदे चोरांच्या धास्तीने ठाण्याच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी चक्क सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कांद्याच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा बसवण्याची सूचना अप्रत्यक्षरित्या पोलिसांकडूनच करण्यात आल्याची माहिती ठाण्यातील महात्मा फुले मंडईतील कांदे-बटाटा व्यापाऱ्यांनी दिली. 

अवकाळी पावसाने संपूर्ण शेती उद्‌ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाले. कांद्याचा हा हंगामदेखील याच पावसाने धुवून काढला. त्यामुळे कांद्याची लागवड कुजून गेल्याने कांद्याचे पीक आले नाही. त्यामुळे गोदामात साठवणूक केलेला कांदा साठेबाजांनी अल्प प्रमाणात बाहेर काढल्याने कांद्याचे दर गगनाला भिडले.

त्यामुळे गेल्या काही दिवसांत कांद्याने चांगलाच भाव खाल्ला असून प्रतिकिलोचे दर तब्बल 150 ते 180 पर्यंत पोहचले आहेत. कांद्याच्या या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडून गेले असतानाच किमती कांद्याच्या चोरीचे प्रकार घडू लागले. यात काही ग्राहकांकडूनदेखील घाईगडबडीत एक-दोन कांदे पिशवीत टाकण्याचे प्रकार व्यापाऱ्यांना मारक ठरू लागले होते. 

ठाण्यातील महात्मा फुले मंडईतील व्यापारी वर्गाने नोकर वाढवण्यासह स्वतः आळीपाळीने रात्रीच्या वेळेत बाजारात "वॉच' ठेवण्यास सुरुवात केली होती. मात्र, असे किती दिवस कांद्याची देखरेख करायची, असा प्रश्‍न भेडसावू लागल्याने पोलिसांच्या निर्देशानंतर या व्यापाऱ्यांनी आपापल्या गाळ्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

मंडईत शिरण्याच्या मार्गावरदेखील सीसी टीव्ही बसवल्याने खरेदीसाठी येणाऱ्यांसह बाजारात वावरणाऱ्या अपप्रवृत्तींवर नजर ठेवणे सुलभ बनले आहे. त्याचबरोबर, रात्रीच्या वेळेत कांद्याची चोरी करणाऱ्यांवरदेखील वचक बसल्याने कांदे व्यापारी निर्धास्त झाले आहेत. 

व्यापाऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचना 
महागाईने कळस गाठल्याने चोरट्यांकडून भाजी मार्केटमधील कांद्याची चोरी करण्याचे प्रकार वाढीस लागले होते. याबाबत भाजी मार्केटमधील विक्रेत्यांकडून पोलिस ठाण्यात तोंडी तक्रारी आल्या होत्या. हे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढू लागल्याने पोलिसांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेत मागील दोन ते तीन दिवसांपासून चोरट्यांवर वॉच ठेवला. रात्रीच्या सुमारास बाजारपेठ बंद होताच भाजी मार्केटमधील दुकानातील कांद्याची 60 किलो वजनाची पोती चोरून नेताना दोघे चोरटे पोलिसांच्या हाती लागले होते. या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांना सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्याचे सूचविण्यात आले, अशी माहिती ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. एम. सोमवंशी यांनी दिली. 

ठाणे पश्‍चिमेकडे दादोजी कोंडदेव स्टेडियमलगत महात्मा फुले मंडईमध्ये 14 ते 16 कांदे-बटाटे व्यापारी आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यंदा पावसामुळेच कांद्याच्या पिकाची नासाडी झाल्याने एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटली. कांदा नाशवंत असल्याने कुठल्याही हंगामातील कांदा जास्त दिवस साठवता येत नाही. आमच्याकडे प्रतिदिन आलेला माल रोजच्या रोज विक्री होतो. तेव्हा, येत्या काही दिवसात कांद्याचे भाव खाली येण्याची चिन्हे आहेत. 
- महेंद्र वरे, व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com