हज यात्रेकरूंसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; कोरोना चाचणी आवश्यक

हज यात्रेकरूंसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; कोरोना चाचणी आवश्यक

मुंबई ः पुढील वर्षीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या हज यात्रेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, या वर्षीच्या 10 डिसेंबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येतील. यंदा कोरोनामुळे प्रवासाच्या तीन दिवस आधी चाचणी करणे अनिवार्य आहे. 

केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज येथे ही घोषणा केली. हे अर्ज ऑनलाईन, ऑफलाईन किंवा हज मोबाईल ऍपवरून करता येतील. या वेळी कोरोनामुळे यात्रेच्या नियमांमध्ये काही बदल झाले असून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. सध्याची स्थिती लक्षात घेऊन भारत तसेच सौदी अरेबिया सरकारने नवे नियम बनवले असून, आरोग्य आणि वयाची बंधने, पात्रतेचे निकष, सौदीतील निवास व्यवस्था, धर्मस्थळी राहण्याचा कालावधी, वाहतूक, आरोग्य सुविधा आदींमध्येही बदल केला आहे.

प्रवासापूर्वी तीन दिवस आधी कोरोना चाचणी करून पीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र प्रवासापूर्वी सादर करावे लागेल. यापूर्वी 21 ठिकाणांहून ही यात्रा सुरू होत असे; मात्र आता ही ठिकाणे 10 पर्यंतच मर्यादित ठेवली आहेत. मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु, कोचीन, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाटा, लखनौ व श्रीनगर येथून ही यात्रा सुरू होईल. मुंबई केंद्रावरून महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधील तसेच दमण, दीव, दादरा नगर हवेली येथील यात्रेकरू जाऊ शकतील. ज्या मुस्लिम महिलांनी 2020 साली "मेहरम' (पुरुष सहप्रवासी) शिवाय यात्रा करण्यासाठी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज 2021 साठीही वैध राहतील. तसेच यासाठी इतर महिलांचे नवे अर्जही स्वीकारले जातील. मेहरमशिवाय यात्रा करू इच्छिणाऱ्या महिलांना लॉटरी पद्धतीतून सवलत दिली जाईल, असेही या वेळी स्पष्ट केले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com