म्हाडातर्फे ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांतील भाडेकरू रहिवाशांकडून सेवाशुल्क वसुली आणि म्हाडातील कंत्राटदारांची नोंदणी आता ऑनलाईन होणार आहे.

मुंबई - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरांतील भाडेकरू रहिवाशांकडून सेवाशुल्क वसुली आणि म्हाडातील कंत्राटदारांची नोंदणी आता ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी ई-बिलिंग सेवा आणि कंत्राटदार नोंदणी सॉफ्टवेअर प्रणाली नुकत्याच कार्यान्वित करण्यात आल्या. 

म्हाडाच्या अखत्यारीतील 56 संक्रमण शिबिरांत सुमारे 22 हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. या भाडेकरू व रहिवाशांकडून सेवाशुल्क वसुलीसाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारी नाहीत. मनुष्यबळाअभावी एका भाडेवसुलीकारावर अनेक वसाहतींतील सेवाशुल्क वसूल करण्याची जबाबदारी पडते. ऑनलाईन ई-बिलिंग सेवेमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार असून, संक्रमण शिबिरांतील सर्व भाडेकरू-रहिवाशांना संगणकावरून घरबसल्या सेवाशुल्क भरता येईल. शीव-कोळीवाडा येथील 5500 संक्रमण गाळे असलेल्या प्रतीक्षानगर वसाहतीत ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. 

ऑफलाईन देयके व त्यांची गणना ही किचकट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. भाडेसंकलन हा या प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचा भाग असून माहिती व्यवस्थापनाच्या योग्य वितरणात या सॉफ्टवेअरची कळीची भूमिका असेल असे सांगण्यात आले. या सॉफ्टवेअरनुसार मिळकत व्यवस्थापक, उपमुख्य अभियंता, भाडेवसुलीकार, लेखा विभाग यांच्या भूमिका निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 

भाडेकरू-रहिवाशांना आवाहन 
संक्रमण शिबिरातील भाडेकरू-रहिवाशांना म्हाडाच्या संकेतस्थळावरील rrebilling.mhada.gov.in या लिंकवर जाऊन सेवाशुल्क भरता येईल. भाडे स्वीकारण्यासाठी बॅंकेच्या एटीएमप्रमाणे यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना पारदर्शक व सुलभ सुविधा मिळाव्यात, या हेतूने ही संगणकीय आज्ञावली सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक भाडेकरू-रहिवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

कंत्राटदारांची नोंदणी सुलभ 
कंत्राटदारांच्या नोंदणीसाठीही सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्यासाठी या पोर्टलवर कंत्राटदाराने एकदाच नोंदणी करणे आवश्‍यक असेल. नोंदणीनंतर अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे, ऑनलाईन भरणा करणे असे टप्पे असतील. या सॉफ्टवेअरमुळे संपूर्ण काम कागदविरहित होण्याबरोबरच कंत्राटदारांच्या अर्जाचा मागोवा घेणे सुलभ होणार आहे. कंत्राटदारांची माहिती कायमस्वरूपी संकलित होईल, असे घोसाळकर यांनी सांगितले. म्हाडाच्या संकेतस्थळावरील contractorregistration.mhada.gov.in या लिंकवर जाऊन कंत्राटदारांना नोंदणी करता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online software system implemented by MHADA