बाजारात केवळ ३५ टक्के हरित फटाके!

हरित (पर्यावरणपूरक) फटाके
हरित (पर्यावरणपूरक) फटाके

नवी मुंबई (बातमीदार) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (पर्यावरणपूरक) वाजवण्यास मंजुरी दिली होती. मात्र हरित फटाके बाजारात उपलब्ध नसल्याने गेल्या वर्षीची दिवाळी कर्णकर्कशच ठरली होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (निरी) या दोन्ही संस्थांनी मिळून पर्यावरणपूरक हरित फटाके बनवले आहेत. हे फटाके बाजारात उपलब्ध असून, इतर प्रदूषणकारी फटाक्‍यांच्या तुलनेत त्यांची आवक ३५ टक्के इतकीच आहे. 

स्वास, स्टार आणि सफल या नावाने विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या फटाक्‍यांमध्ये सल्फरचा वापर कमी असल्याने इतर फटाक्‍यांच्या तुलनेत ३० ते ४० टक्के प्रदूषण कमी होते. शिवाय हे फटाके फोडल्यास रंगीबेरंगी, सुवासिक धूर हवेत दरवळतो. मात्र, या फटाक्‍यांबाबत पुरेशी माहिती नसल्याने तसेच फटाके म्हटले की ते आवाजीच असावेत. असे समीकरण असल्याने हरित फटाक्‍यांची विचारणाही होताना दिसत नाही. वाशी येथील श्री लक्ष्मी फायर वर्क्‍सचे ओमकार बेर्डे यांनी सांगितले की, हरित फटाके बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र, त्यांची संख्या सामान्य फटाक्‍यांच्या तुलनेत कमी आहे. 

बाजारात हरित फटाक्‍यांच्या नावाखाली प्रदूषणकारी फटाक्‍यांची विक्रीदेखील होऊ शकते. हे लक्षात घेऊन सीएसआयआरने हरित फटाक्‍यांवर क्‍यूआर कोड दिला आहे. तो स्कॅन केल्यास हरित फटाके ओळखता येऊ शकतात. सध्या बाजारात हरित फटाक्‍यांचे मोठा पाऊस आणि २५ व ५० शॉट असे तीनच पर्याय उपलब्ध आहेत. हरित फटाक्‍यांच्या किमतीही अन्य फटाक्‍यांच्या दरांच्या तुलनेत काहीशा जास्त आहेत. 

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हरित फटाक्‍यांबद्दल ऐकले होते. तेव्हा हे फटाके उपलब्ध नव्हते आणि आताही नाहीत. या फटाक्‍यांबद्दल बरेचसे विक्रेते आणि ग्राहकही अनभिज्ञ आहेत. या फटाक्‍यांबाबत विक्रेत्यांमध्येही जनजागृती होणे गरजेचे आहे.
- गणेश कांबळे, फटाके विक्रेता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com