esakal | मुंबईत फक्त 76 हजार डोस दाखल, लसीकरण केंद्रांबाहेर नागरिकांचा गोंधळ

बोलून बातमी शोधा

covishield vaccine available
फक्त 76 हजार डोस दाखल, केंद्रांबाहेर नागरिकांचा गोंधळ
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: राष्ट्रीय पातळीवर राबवल्या जाणार्‍या लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. लसच उपलब्ध होत नसल्याने सुरळीत लसीकरण करायचे कसे असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, काल रात्री 2 वाजताच्या सुमारास मुंबईत लसीचे डोस दाखल झाले असून फक्त 76 हजार डोस मुंबईला मिळाले आहेत.

मुंबईला कोव्हिशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. पण, तो ही एका दिवसापुरताच मर्यादित असून डोस सरकारी आणि पालिका लसीकरण केंद्रांना वितरीत करण्यात आला आहे. मात्र, खासगी लसीकरण केंद्रांना साठा पुरवला गेला नसल्याने अनेक केंद्र आज बंद आहेत. त्यामुळे, आज फक्त शासकीय लसीकरण केंद्रांवरच 12 नंतरच लसीकरण सुरू होणार आहे.

हेही वाचा: मास्क घाला! रेल्वेकडून विनामास्क प्रवाशांवर कडक कारवाई

मुंबईकरांनी गर्दी करु नये

लसीकरणाची संपूर्ण माहिती देऊनही मुंबईकर लसीकरण केंद्रांवर धाव घेत आहेत. त्यामुळे, केंद्रांवर मोठी गर्दी झाली आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर अशी गर्दी करु नये असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

कोविड केंद्रांवर गर्दी

मुंबईतील बीकेसी आणि नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांनी मोठी रांग लावली आहे. ज्येष्ठ नागरिकांपासून 45 वयोगटावरील अनेक नागरिक रांगेत उभे आहेत. त्यात कडक ऊन असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे.

नेस्को बाहेर अर्धा किलोमीटर रांग

नेस्को लसीकरण केंद्रांबाहेर अर्धा किलोमीटर लांबच लांब रांग लागल्या आहेत. नागरिकांनी अशीच लसीकरण केंद्रांवर गर्दी केली तर लसीकरण केंद्र सुपर स्प्रेडर बनतील. या ठिकाणी 1600 'लसीचे डोस देण्यात आले आहेत.

फक्त दुसरा डोस देणाऱ्यांना प्राधान्य

खासगी लसीकरण केंद्रांवर फक्त दुसरा डोस असणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र आज अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. पण फक्त शासकीय लसीकरण केंद्रांवरच लसीकरण होणार आहे.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी पालिकेकडून फक्त दोन दिवसात हजार बेड्सची व्यवस्था

73 पैकी 40 लसीकरण केंद्र बंद

मुंबईमध्ये लसीचा साठा सध्या संपुष्टात आला आहे. अशातच मुंबईतील जवळपास 40 लसीकरण केंद्र आज बंद आहेत. या ठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण आज होणार नाही. मात्र या लसीकरण केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. साठा सध्या उपलब्ध आहे तो केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांना आज लस उपलब्ध न होण्याची नामुष्की आली आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

only 76 thousand doses mumbai stocks covishield vaccine available