'आरक्षण वाढवून गुणवत्तेची हत्या'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी, तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात शनिवारी सकाळी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वांद्रे येथे आंदोलन केले.

मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी, तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात शनिवारी सकाळी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वांद्रे येथे आंदोलन केले.

"आरक्षणाची टक्केवारी 50 हून अधिक नसावी', "आरक्षण वाढवून मेरिटची हत्या करण्यात येत आहे,' अशी घोषणाबाजी करीत विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध केला. 

मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने संतप्त झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते.

आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया स्थगित करीत आरक्षणाबाबत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. मराठा आरक्षणासाठी सरकारने प्रवेश प्रक्रिया स्थगित करीत त्याबाबत अध्यादेश काढल्याने खुल्या व अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्याला जोरदार विरोध केला. प्रवेश प्रक्रिया स्थगित केल्याने आमचे प्रवेश वेळेत होणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी खुल्या गटातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. 

"हक्काची जागा मिळावी' 
मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाही. परंतु, आमच्या गुणवत्तेनुसार मिळणाऱ्या जागा मराठा समाजाला देण्यात येत आहेत. ही एकप्रकारे गुणवत्तेची हत्या करण्याचा प्रकार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनीही सरकारकडून शुल्क घेण्यास नकार दिला आहे. मग, आम्ही का शुल्क घ्यावे, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी आम्हाला आमच्या हक्काच्या गुणवत्तेनुसार मिळणारी जागा द्यावी, यासाठीच आमचे हे आंदोलन असल्याचे या आंदोलनातील डॉ. अभिषेक कोठारी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open Category students oppose decision of Maharashtra Government to apply reservation in Medical Field