कुर्झे धरणाचे दरवाजे उघडले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

तलासरी परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, नदी, ओढे व नाल्यांना पूर आले आहेत. तसेच तालुक्‍यातील कुर्झे धरण भरून वाहू लागल्याने प्रशासनाकडून सतर्कता म्हणून धरणाचे तीन दरवाजे ३० सेंटिमीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत.

मुंबई : तलासरी परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, नदी, ओढे व नाल्यांना पूर आले आहेत. तसेच तालुक्‍यातील कुर्झे धरण भरून वाहू लागल्याने प्रशासनाकडून सतर्कता म्हणून धरणाचे तीन दरवाजे ३० सेंटिमीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामधून १,९४२ क्‍युसेक (१७०० लिटर प्रतिमिनीट) पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वारोळी नदीला पूर आला आहे. 

कुर्झे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याची पातळी समान राहण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे मंगळवारी (ता. 30) दुपारी उघडण्यात आले आहेत. 
दिवसभर मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास संबंधित गावातील सरपंच, पोलिस पाटील यांनी, काही दुर्घटना घडल्यास तत्काळ कार्यालयास माहिती द्यावी, अशा सूचना तलासरी व उंबरगावच्या तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. कुर्झे धरणात ७५.४ घ.मी. पाणी साठवण्याची क्षमता असून, आतापर्यंत ६७.५ घ.मी. पाणी धरणात जमा झाले आहे. तालुक्‍यात आतापर्यंत १२८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

सतर्कतेचा इशारा 
तालुक्‍यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. धरण परिसर, तसेच नदीकिनाऱ्यावरच्या गावांतील नागरिकांनाही याबाबत पूर्वसूचना देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: open the door of Kujhe Damn