जेनेरिक औषधांचा मार्ग मोकळा

जेनेरिक औषधांचा मार्ग मोकळा
जेनेरिक औषधांचा मार्ग मोकळा

नवी मुंबई : शहरातील गोरगरीब जनतेसाठी तयार करण्यात येणाऱ्या जेनेरिक औषधांच्या दुकानाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जेनरिक औषधांच्या या दुकानासाठी महापालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.१४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जेनरिक औषधांच्या या दुकानाचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यासाठी पालिकेकडून लवकरच एका कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे.

आरोग्य विभागाला संजीवनी देण्यासाठी पालिका प्रशासनाने जेनरिक औषधांचा प्रस्ताव आणला होता. मात्र, त्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिल्यानंतरही प्रशासकीय कामाला गती मिळत नव्हती. महासभा व स्थायी समिती सभेत मंजूर झालेल्या जेनरिक औषधांचा प्रस्ताव अमलात येण्यासाठी महापालिकेच्या सेवेत असलेले दोन वैद्यकीय अधिकारी सेवा पूर्ण करून सेवानिवृत्तही झाले; परंतु जेनरिक औषधांचे दुकान सुरू होऊ शकले नाही. याबाबत पालिकेने केलेल्या चाचपणीत चार फार्मासिस्ट, लिपिक व लेखापाल अशी विविध पदे भरावी लागणार होती. त्यांचे वेतन व सेवानिवृत्तीपर्यंतच्या भत्त्यांची तरतूद महापालिकेला करावी लागणार होती; परंतु हा खर्च वाचवण्यासाठी पालिका जेनरिक औषध वाटपांची जबाबदारी कंत्राटदाराला देणार आहे. शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या कामकाजात बाह्य यंत्रणेला जेनरिक औषधे वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जेनरिक मेडिकल स्टोअर्सला हा ठेका देण्यात येणार आहे. 

वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयातील पूर्वीच्या बंद पडलेल्या जनरल मेडिकलच्या जागेत जेनरिक औषधांचे दुकान सुरू केले जाणार आहे. या दुकानातून महापालिकेला वर्षाला २६ लाख दोन हजार ८०० रुपये इतकी रक्कम भाड्यापोटी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनांतर्गत बीपीपीआयच्या निर्देशांकानुसार उत्पादनांचा साठा व विक्री करण्यासाठी बंधनकारक राहणार आहे. 

महागड्या औषधांपासून सुटका
नवी मुंबई महापालिकेमार्फत बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली तसेच २३ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत मोफत गोळ्या-औषधे दिली जातात. मात्र, रुग्णालयात उपलब्ध नसलेली औषधे खासगी दुकानातून घेताना गरीब रुग्णांच्या खिशाला कात्री लागत होती; परंतु आता जेनरिक औषधांचे दुकान वाशी रुग्णालयाच्या आवारात सुरू होणार असल्याने गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com