शहरात जोपर्यंत कामे सुरू आहेत, तोपर्यंत खड्डे पडणारच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

आदित्य ठाकरे यांचे ठाण्यातील कार्यक्रमात उद्‌गार

ठाणे : ‘शहरात जोपर्यंत कामे सुरू आहेत, तोपर्यंत खड्डे पडणारच,’ असे उद्‌गार शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी काढल्यानंतर त्यांनाच गुरुवारी ठाण्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागला. घोडबंदर रोड येथील खड्ड्यांमुळे त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले.

गायमुख चौपाटीच्या उद्‌घाटनासाठी गुरुवारी ठाण्यात आलेल्या आदित्य ठाकरे यांना घोडबंदर रोडच्या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. कापूरबावडी तसेच डीमार्टच्या परिसरात त्यांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकावे लागले.

‘शहरात जोपर्यंत कामे सुरू आहेत, तोपर्यंत खड्डे पडणारच,’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रमानंतर देऊन प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला सावरण्याचा प्रयत्न केला होता. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर रस्तेही ठीक होतील, असा दावा त्यांनी केला.

गुरुवारी ठाण्यातील वनस्थळी उद्यानाचा लोकार्पण सोहळा, आगरी कोळी भवन भूमिपूजन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण आणि गायमुख घाट भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ते ठाण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

सेनेकडून भाजपाचाही समावेश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी ठाणे पालिकेच्या भूखंडावर साकारलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पाच महिन्यांपूर्वी भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर आज त्याचा लोकार्पण सोहळा होत असल्याने त्याला भाजपने आक्षेप घेतला होता. अखेर आक्षेप घेणारे भाजपचे गटनेते नारायण पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून या उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला शिवसेनेने सामावून घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opening of Gaumukh Chowpatty