सीएए-एनआरसी कायद्याबाबत विरोधकांकडून दिशाभूल : माधव भंडारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पोटदुखीमुळे विरोधक सीएए आणि एनआरसी कायद्याबाबत नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला.

कल्याण : नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पोटदुखीमुळे विरोधक सीएए आणि एनआरसी कायद्याबाबत नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे आयोजित ३१ व्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप रविवार (ता. २२) रोजी कल्याणमध्ये झाला. ओक हायस्कूल शाळेच्या सभागृहात हे संमेलन झाले. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार आणि स्वागताध्यक्ष नरेंद्र पवार आणि माजी आमदार प्रभाकर संत आदी उपस्थित होते.

ही बातमी वाचा ः आता शाळेत देखिल बायोमेट्रीक हजेरी

या वेळी सीएए-एनआरसी समज-गैरसमज या विषयावर बोलताना भंडारी यांनी विरोधकांवर टीका केली. या वेळी ते म्हणाले, नुकताच मंजूर करण्यात आलेला सीएए कायदा हा मोदी सरकारने आणलेला नसून पंडित नेहरूंच्या काळातील आहे. तसेच २००३ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते मनमोहन सिंग यांनीही अशा प्रकारच्या कायद्याची मागणी केली होती. ज्याला सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्या वेळी विरोध का केला नाही, असा सवाल भंडारी यांनी केला. या वेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली.

जातीच्या भिंती संपवून एकत्र यायला हवे
या वेळी अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, ज्या माणसाने आयुष्यभर जात हा शब्द मिटवण्यासाठी आपले आयुष्य वेचले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना एका जातीच्या पठडीत बांधून ठेवले जात आहे. हिंदू हा केवळ धर्म नसून सर्वसमावेशक असा विचार आहे. त्यामुळे भलेही आपली वेगवेगळी विभागणी झाली असली, तरी आपण सर्व एकाच सूत्राने बांधलो गेलेलो आहोत. तसेच जातीच्या भिंती संपवून आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यातच देशहित असल्याचेही पोंक्षे या वेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opponents mislead on CAA-NRC law: Madhav Bhandari